बंगळुरू - कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला जात आहे. त्यात महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर आता कर्नाटकमध्येही लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांचीची घोषणा झाली आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यात १४ दिवसांच्या निर्बंधांची घोषणा केली आहे. राज्यात उद्या रात्री ९ वाजल्यापासून लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांना सुरुवात होईल. हे निर्बंध पुढचे १४ दिवस लागू राहतील. (Coronavirus outbreak, COVID curfew to be implemented in Karnataka)
या निर्बंधांच्या काळात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सहा ते १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. सकाळी दहा वाजल्यानंतर ही दुकाने बंद होतील. तसेच सार्वजनिक वाहतुकही बंद राहील.
कर्नाटक सरकारने दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. मात्र लॉकडाऊनकाळात राज्याबाहेर आणि राज्यात प्रवास करण्याची परवानगी नसेल. तसेच उपायुक्तांनी कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी उपाय करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाईल, अशी घोषणाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केली आहे. देशभरात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाविरोधातील लस दिली जाणार आहे.