नवी दिल्ली - एकीकडे देश अनलॉक करून हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर आणण्याच्या प्रयत्नांनी वेग घेतलेला असतानाच देशातील विविध भागात कोरोनाचा फैलावही चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १४ हजार ८२१ नवे रुग्ण सापडले असून, या २४ तासांत ४४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल १४ हजार ८२१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा चार लाख २५ हजार २८२ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ४४५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याने देशात कोरोमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १३ हजार ६९९ वर पोहोचली आहे. देशामध्ये सध्या कोरोनाचे एक लाख ७४ हजार ३८७ अॅक्टिव्ह रुग्ण असून, आतापर्यंत दोन लाख ३७ हजार १९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान, कोरोनामुळे महाराष्ट्रातही गंभीर परिस्थिती ओढवलेली असून, राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ हजार ८७० नवे रुग्ण सापडले असून, १०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३२ हजार ७५ एवढी झाली असून, त्यामध्ये ६० हजार १४७ अॅक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तर ६५ हजार ७४४ रुग्णांनी कोरोनाला मात दिली आहे. राज्यात आतापर्यंत ६ हजार १७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या