नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. आतापर्यत 29 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून 2 लाख 3 हजार 269 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांतच कोरोनाच्या नव्या 1990 नव्या रुग्णांचे निदान झाल्याने देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजार 496 वर पोहोचला आहे.
कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा वेग देखील मंदावला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. त्यातच आता भारतात कोरोनाचा उद्रेक 21 मेपर्यत संपेल असा दावा सिंगापूर यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड डिजाइनने केला आहे. त्यामुळे या दाव्यानंतर भारतीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.
सिंगापूर यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड डिजाइनने आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीनं कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीचं संशोधकांनी विश्लेषण केलं आहे. या आकडेवारीनूसारस 21 मेपर्यत भारतातून कोरोनाचा नाश होईल. तसेच जगभरातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
देशभरात ३ मेपर्यत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. तसेच हा लॉकडाऊन ज्या राज्यात कोरोनाची संख्या जास्त आहे. त्या ठिकाणी वाढविण्याचा विचार सरकार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. 16 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला तर कोरोनाचे रुग्ण आढळणार नाहीत असा दावा करण्यात येत आहे.
आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1990 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होऊन ती 26 हजार 496 पर्यंत पोहोचली आहे. तर या 24 तासात देशभरात कोरोनामुळे 49 जणांचा मृत्यू झाला आहे. तर याच काळात 741 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 5 हजार 804 कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा सार्वत्रिक प्रसार झालेला नाही. मात्र काही शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशातील केवळ 27 जिल्ह्यात कोरोनाचे 68.2 टक्के रुग्ण सापडले आहेत.