नवी दिल्ली – देशात कोरोनाचा कहर माजलेला असताना त्याची झळ थेट राष्ट्रपती भवनपर्यंत पोहचली आहे. राष्ट्रपती भवन परिसरात आपल्या कुटुंबासह राहणाऱ्या एका महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने राष्ट्रपती भवनात खळबळ माजली आहे. या महिलेचा पती राष्ट्रपती भवनातील एका आयएएस अधिकाऱ्याच्या कार्यालयात काम करत असल्याने चिंता वाढली आहे.
या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला उपचारासाठी आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर तिचा पती, कुटुंबातील इतर सदस्य आणि शेजारी राहणाऱ्यांपैकी एकूण ११ जणांना क्वारंटाईन राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रपती भवनात काम करणारे आयएएस अधिकारी यांनीदेखील सेल्फ क्वारंटाईन करुन घेतलं आहे.
राष्ट्रपती भवन परिसरात काम करणारे १०० पेक्षा जास्त सफाई कर्मचारी, माळी आणि अन्य लोक या महिलेच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. त्या सर्वांना योग्य ती काळजी घेण्यास सांगितले आहे. या प्रकारानंतर राष्ट्रपती भवनात सतर्कता आणखी वाढवण्यात आली आहे. प्राथमिक सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रपती भवनातील ज्या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तिची सासू काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे मृत पावली आहे. ती वाडा हिंदूराव परिसरात राहत होती. कोरोनाग्रस्त सासूच्या संपर्कात आल्याने या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
या महिलेची तब्येत बिघडल्यानंतर तिची कोरोनाची चाचणी करण्यात आली. जेव्हा रविवारी या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यानंतर राष्ट्रपती भवनात ही बातमी वाऱ्याने पसरली. यानंतर तात्काळ प्रशासनाने या महिलेला आणि तिच्या कुटुंबाच्या संपर्कात येणाऱ्यांना क्वारंटाईन केलं. महिलेच्या मुलीमध्येही कोरोनाचे सौम्य लक्षण दिसत होते मात्र तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वीही एका गायिकेला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा गायिकेच्या कार्यक्रमात एक खासदारही उपस्थित होते. या खासदारांचा वावर संसदेत होता. मधल्या काळात या खासदाराने राष्ट्रपती भवनात हजेरी लावली होती. तेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही कोरोनाची चाचणी केली होती. पण सुदैवाने त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.