नवी दिल्ली- देशातील कोरोनाच्या फैलावाचा वेग गेल्या काही दिवसात चिंताजनक पातळीपर्यंत वाढला आहे. गेल्या 24 तासांतच कोरोनाच्या नव्या 1990 नव्या रुग्णांचे निदान झाल्याने देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजार 496 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत केवळ 24 तासांत सापडलेले हे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून, महाराष्ट्रातही गेल्या 24 तासात 811 नव्या कोरोनाबाधितांचे निदान झाले आहे.
आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1990 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होऊन ती 26 हजार 496 पर्यंत पोहोचली आहे. तर या 24 तासात देशभरात कोरोनामुळे 49 जणांचा मृत्यू झाला आहे. तर याच काळात 741 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 5 हजार 804 कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले आहेत.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा सार्वत्रिक प्रसार झालेला नाही. मात्र काही शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशातील केवळ 27 जिल्ह्यात कोरोनाचे 68.2 टक्के रुग्ण सापडले आहेत.
जगातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा विचार केल्यास जगभरात आतापर्यंत कोरोनाचे 28 लाख 96 हजार 959 रुग्ण सापडले आहेत. तर 2 लाख 02 हजार 845 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात आतापर्यंत 8 लाख 16 हजार 550 कोरोनाबाधित बरे झाले आहेत.