नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने भारतात सध्या धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी कोरोना विषाणूचा भारतात प्रचंड वेगाने फैलाव होत आहे. (Coronavirus in India) गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १ लाख ६१ हजार रुग्ण सापडले आहेत. तर ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर्षी जानेवारीमध्ये देशातील कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमालीचा मंदावला होता. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. आता एप्रिल महिन्याच्या अखेरीस देशात कोरोना संसर्गाची सर्वोच्च पातळी गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतात कोरोनाचा फैलाव नेमका का वेगाने होतोय. याबाबत तज्ज्ञांनी चार कारणे सांगितली आहेत. ती कारणे पुढील प्रमाणे आहेत. (Coronavirus is spreading rapidly in India, Experts state four reasons)
कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंटयावेळी दोन प्रकराच्या विषाणूंनी लोकांना त्रस्त केले आहे. यातील एक देशी आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक विदेशी विषाणू आहेत. आतापर्यंत ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका व न्यूयॉर्क मध्ये सापडलेले व्हेरिएंट भारतातही सापडले आहेत. मार्चच्या अखेरीस भारतातील नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलने एका नव्या व्हेरिएंट डबल म्युटेंटची माहिती दिली होती. महाराष्ट्र, दिल्ली आणि पंजाबमधून घेण्यात आलेल्या सॅम्पलमधून एका व्हेरिएंटची ओळख पटली आहे. व्हायरोलॉजिस्ट शाहिद जमिल यांनी पीटीआयला सांगितले की, नव्या डबल म्युटेंटमुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार १५-२० टक्के केस नव्या व्हेरिएंटचे आहेत. ब्रिटनमधील नवा कोरोना व्हेरिएंट आधीच्या तुलनेत ५० टक्के वेगाने पसरतो.
कोरोना प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष यावर्षी जानेवारी महिन्यात कोरोनाचा वेग कमी झाल्यानंतर लोक कमालीचे बेफिकीर झाले. सरकारने कोरोनाचे नियम पाळण्याचे लोकांना सातत्याने आवाहन केले. जमील यांच्या म्हणण्यानुसार भारतात सारे काही खुले आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मात्र राज्य सरकारे आता हळुहळू विविध प्रकारचे निर्बंध लागू करत आहेत.
लसीकरणाची गती देशभरात जानेवारी महिन्यात लसीकरणाल सुरुवात झाली. मात्र अनेक लोक कोरोनावरील लस घेण्याचे टाळत होते. जमील यांनी सांगितले की, हेल्थ वर्कर्ससुद्धा लस घेण्याचे टाळत होते. त्याशिवाय मार्च महिन्यात जेव्हा ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांचे लसीकरण सुरू झाले तेव्हासुद्धा लोक लसीकरण केंद्रांवर येत नव्हते. आतापर्यंत केवळ ७ टक्के लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर केवळ ५ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. लोकांमधील अँटिबॉडी संपुष्टात येतेय याशिवाय इंस्टिट्युट ऑफ जिनोमिक्स अँड इंटीग्रेटिव्ह बायोलॉलीच्या एका नुकत्याच झालेल्या संशोधनामधून कोरोनामुळे संसर्ग झालेल्या २० टक्क्यांपासून ३० टक्क्यांपर्यंतच्या लोकांमध्ये सहा महिन्यांनंतर अँटिबॉडी संपुष्टात येत आहेत. त्यामुळेच लोकांना संसर्ग होत आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) कानपूरमध्ये तज्ज्ञांच्या मते कोरोनाची दुसरी लाट एप्रिलच्या मध्यावर शिखर गाठू शकते.