लंडन : जगात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने १९ कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. प्रगत देश कोरोनाच्या महाभयंकर संकटापुढे हतबल झाले आहे. कोरोनाच्या व्हेरिएंटवर जगभरात यावर संशोधन सुरू आहे. कोरोनाचा ‘सुपर म्युटंट व्हेरिएंट’ अत्यंत धोकादायक असून तीन जणांपैकी एकाचा मृत्यू होईल असा गंभीर इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचे सर्वात जास्त धोकादायक रूप आता समोर आले आहे. येत्या काळात हा नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक होऊन तीनपैकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागत असल्याचा दावा ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी केला आहे. सायंटिफिक ॲडव्हायझरी ग्रुप फॉर इमर्जन्सीने याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे.अहवालानुसार, कोरोनाचा भविष्यात येणारा व्हेरिएंट एमईआरएस व्हेरिएंटपेक्षाही अधिक प्राणघातक असू शकतो. या व्हेरिएंटमुळे जगभरात मृत्यू दर जवळपास ३५ टक्के एवढा राहण्याची शक्यता आहे. या संशोधनात केलेल्या दाव्यानुसार, तीन जणांपैकी एकाचा मृत्यू अटळ आहे.
कोरोनाचा भविष्यात येणारा सर्वाधिक घातक व्हेरिएंट हा प्राण्यांपासून येण्याची शक्यता संशोधन करणाऱ्या गटाने वर्तवली आहे. त्यामुळे कोरोनाचा पुढील व्हेरिएंट रोखायचा असेल तर व्हायरस असणाऱ्या प्राण्यांना मारावे लागेल. कोरोनाच्या या व्हेरिएंटवर कोविड -१९ ची लसही कुचकामी ठरू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी रिसर्चमध्ये दिला आहे. जर असे झाले तर जगभर मृत्यूदरात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातले आहे.
लस घेतली तरी...अमेरिकन आरोग्य प्राधिकरणाच्या अंतर्गत दस्तऐवजाचा हवाला देत, मीडिया रिपोर्ट्समध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. कोरोना लसीकरण झालेले आणि एकही लस न घेतलेल्या दोन्ही गटांकडून या विषाणूचा प्रसार केला जाऊ शकतो, असे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अर्थातच सीडीसीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे लस घेतलेल्या लोकांनादेखील विशेष काळजी घेण्याच गरज आहे.
लसीकरण ४१ कोटींवरदेशात रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे ४१,८३१ नवे रुग्ण आढळले तर ५४१ जणांचा मृत्यू झाला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. देशात एकूण मृतांची संख्या ४,२४,३५१ झाली आहे. देशव्यापी मोहिमेत एकूण ४७.०२ कोटी लोकांना विषाणूवरील लस दिली आहे.