नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. देशातही वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या २४ तासांत १३३४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर २७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात १५७१२ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे. तर ५०७ लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या १४ दिवसांत २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाची कोणतीही घटना समोर आली नाही. तर देशभरात २२३१ कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत १३३४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर २७ जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
आतापर्यंत देशात १५७१२ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे. तर ५०७ लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, गेल्या २८ दिवसांत पुदुचेरीमधील माहे आणि कर्नाटकातील कोडागुमध्ये कोणतीही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही, असे लव अग्रवाल यांनी सांगितले. याचबरोबर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ७५५ डेडिकेटेड हॉस्पिटल आणि१३८९ डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटर्स तयार करण्यात आले आहेत. या सेंटर्सवर २१४४ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात, असे लव अग्रवाल यांनी सांगितले.
आयसीएमआरचे रमन आर गंगाखेडकर यांनी सांगितले की, "आम्ही आत्तापर्यंत ३८६७९१ चाचण्या घेतल्या आहेत. काल ३७१७३ चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी २९२८७ चाचण्या आयसीएमआर नेटवर्कच्या प्रयोगशाळांमध्ये घेण्यात आल्या. तर ७८८६ चाचण्या खासगी प्रयोगशाळांमध्ये घेतल्या आहेत."