Coronavirus: ...ही तर भारतासाठी एक संधीच, मोदी सरकारला राहुल गांधींनी दिला मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 01:13 PM2020-04-18T13:13:15+5:302020-04-18T13:20:54+5:30
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच अमेठीतल्या गरजू लोकांच्या मदतीसाठी पाच ट्रक तांदूळ, पाच ट्रक पीठ, गहू आणि एक ट्रक डाळ गरजू लोकांना पाठवले होते.
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात दिवसागणिक वाढतच चालला आहे. कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या देशात 14,000 पेक्षा जास्त झाली आहे. सरकारकडून उपाययोजना राबवल्या जात असतानाच इतर राजकीय नेतेसुद्धा मदतीसाठी पुढे आल्याचं पाहायला मिळतं आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच अमेठीतल्या गरजू लोकांच्या मदतीसाठी पाच ट्रक तांदूळ, पाच ट्रक पीठ, गहू आणि एक ट्रक डाळ गरजू लोकांना पाठवले होते.
अमेठी जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते अनिल सिंह म्हणाले की, अमेठीमध्ये कुणीही उपाशी राहणार नाही. प्रत्येक गरजूंपर्यंत मदत साहित्य पुरवले जाणार आहे. लोकसभा मतदारसंघातील 877 ग्रामपंचायती आणि नगर पंचायत / नगरपालिकांमध्ये राहुल गांधी यांच्या मार्फत 16,400 रेशन किट्सचं वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी ट्विट केले असून, कोरोना हे एक मोठे आव्हान तर आहेच, पण त्याचबरोबर संधी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
ट्विट करत ते लिहितात, कोरोनासारखी जागतिक महामारी हे एक मोठं आव्हान आहे, परंतु ही तर एक संधी आहे. संकटाच्या काळात आवश्यक असलेल्या नावीन्यपूर्ण उपायांवर काम करण्यासाठी आपल्या वैज्ञानिक, अभियंता आणि डेटा तज्ज्ञांच्या विशाल समुदाय वाढवण्याची आवश्यकता आहे.
शनिवारी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरस संक्रमणाची संख्या वाढून 14,378 झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासात कोरोनाची 991 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि 43 लोकांचा मृत्यू झाला आहे.The #Covid19 pandemic is a huge challenge but it is also an opportunity. We need to mobilise our huge pool of scientists, engineers & data experts to work on innovative solutions needed during the crisis.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 18, 2020