नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात दिवसागणिक वाढतच चालला आहे. कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या देशात 14,000 पेक्षा जास्त झाली आहे. सरकारकडून उपाययोजना राबवल्या जात असतानाच इतर राजकीय नेतेसुद्धा मदतीसाठी पुढे आल्याचं पाहायला मिळतं आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच अमेठीतल्या गरजू लोकांच्या मदतीसाठी पाच ट्रक तांदूळ, पाच ट्रक पीठ, गहू आणि एक ट्रक डाळ गरजू लोकांना पाठवले होते.अमेठी जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते अनिल सिंह म्हणाले की, अमेठीमध्ये कुणीही उपाशी राहणार नाही. प्रत्येक गरजूंपर्यंत मदत साहित्य पुरवले जाणार आहे. लोकसभा मतदारसंघातील 877 ग्रामपंचायती आणि नगर पंचायत / नगरपालिकांमध्ये राहुल गांधी यांच्या मार्फत 16,400 रेशन किट्सचं वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी ट्विट केले असून, कोरोना हे एक मोठे आव्हान तर आहेच, पण त्याचबरोबर संधी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ट्विट करत ते लिहितात, कोरोनासारखी जागतिक महामारी हे एक मोठं आव्हान आहे, परंतु ही तर एक संधी आहे. संकटाच्या काळात आवश्यक असलेल्या नावीन्यपूर्ण उपायांवर काम करण्यासाठी आपल्या वैज्ञानिक, अभियंता आणि डेटा तज्ज्ञांच्या विशाल समुदाय वाढवण्याची आवश्यकता आहे.
Coronavirus: ...ही तर भारतासाठी एक संधीच, मोदी सरकारला राहुल गांधींनी दिला मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 1:13 PM