नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी जगभरात १४० ठिकाणी प्रयोग सुरू असून भारतातील कोव्हॅक्सिन व झायकोव्ह-डी या दोन लसींसह फक्त ११ लसींच्या माणसांवर चाचण्या सुरू आहेत. असे असले तरी कोरोनावरील प्रतिबंधक लस पुढील वर्षीच रुग्णांसाठी उपलब्ध होईल, असे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने रविवारी म्हटले होते. मात्र आयसीएमआरच्या भूमिकेशी विसंगत असलेले हे मत अखेर या मंत्रालयाने मागे घेतले.कोव्हॅक्सिन ही लस १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध करण्याचे लक्ष्य बाळगलेल्या इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) भूमिकेशी विसंगत मत केंद्र सरकारच्या एका महत्त्वाच्या खात्याने व्यक्त केले आहे. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, कोरोना प्रतिबंधक लसींच्या माणसांवर चाचण्या सुरू असल्या तरी या लसीचा रुग्णांसाठी प्रत्यक्ष वापर पुढील वर्षीपासूनच सुरू करता येईल. कोव्हॅक्सिन लसीच्या माणसांवरील चाचण्या जलद गतीने पार पाडा, असे आयसीएमआरने या संशोधनात सहभागी झालेल्या १२ संस्थांना कळविले होते. मात्र संशोधनामध्ये अशी घाईगर्दी करणे योग्य नाही, असे मत व्यक्त करीत देशभरातील शास्त्रज्ञांनी आयसीएमआरच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.मजकूर त्वरित संपादित केलाकोरोनाची प्रतिबंधक लस पुढील वर्षी रुग्णांसाठी उपलब्ध होईल, असे निवेदन केंद्रीय विज्ञान वतंत्रज्ञान खात्याने प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या वेबसाइटवर झळकविले होते. मात्र आयसीएमआरच्याभूमिकेपेक्षा हे विसंगत मत आहे, हे लक्षात येताच त्या निवेदनातील मजकूर लगेचच पुन्हा संपादित करण्यात आला. या मंत्रालयाशी संबंधित शास्त्रज्ञ डॉ. टी. व्ही. वेंकटेश्वरन यांनी हे निवेदन लिहिले होते.
coronavirus: कोरोनाची लस पुढील वर्षीच येणार, केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 6:30 AM