नवी दिल्ली : जगातील बहुसंख्य लोकांना कोरोना विषाणूच्या संसर्गावरील प्रतिबंधक लसीची गरज नाही, असे आॅक्सफर्ड विद्यापीठातील संसर्गरोगतज्ज्ञ सुनेत्रा गुप्ता यांनी म्हटले आहे. फ्लूप्रमाणेच हाही आजार आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाबाबत फार चिंता करू नये, असेहीत्यांनी सांगितले.
सुनेत्रा गुप्ता म्हणाल्या की, जे निरोगी व तरुण आहेत, ज्यांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे व ज्यांना एकाहून अधिक व्याधी नाहीत अशा लोकांचे कोरोना संसर्गामुळे फार नुकसान झालेले नाही. कोरोना विषाणूची साथ नैसर्गिकरीत्याच संपुष्टात येईल. तसेच फ्लूप्रमाणे हाही आजार आपल्या जीवनाचा एक भाग होईल. कोरोनावर प्रतिबंधक लस तयार करणे तसे सोपे आहे. काही महिन्यांत ही लस बनविण्यातयश मिळेल.
जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजविला असून, या साथीचा फैलाव रोखण्याकरिता भारतासह बहुसंख्य देशांनी लॉकडाऊनसह विविध उपाय योजले आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. या साथीचा फैलाव कमी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. या संसर्गावरील लस शोधण्यासाठी काही देशांत संशोधन सुरू आहे. लॉकडाऊनला सुनेत्रा गुप्ता यांनी नेहमीच विरोध केला असून, आताही त्यांनी याच मतांचा पुनरुच्चार केला आहे.फैलाव पूर्णपणे रोखला जाणार नाहीसंसर्गरोगतज्ज्ञ सुनेत्रा गुप्ता यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव पूर्णपणे रोखला जाणार नाही. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन यशस्वीरीत्या राबविण्यात आला. मात्र तिथे कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले. कोरोनाची दुसरी लाट असे वर्णन केले जाते ती प्रत्यक्षात वेगळ्या प्रदेशांत आलेली कोरोना संसर्गाची पहिली लाट आहे.