नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशातील विविध राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एकीकडे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. अगदी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पंजाब अशा सर्वच राज्यात बहुतांश ठिकाणी आज सकाळपासून शुकशुकाट दिसून येत आहे.
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी लॉकडाऊनची घोषणा केली होती. रविवारी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर आज सोमवारी सकाळीही अनेकजण घरातच राहणे पसंत करत आहेत. काही तुरळक अपवाद वगळता रस्त्यावर वाहनांची वर्दळही तुरळक दिसत आहे. राजधानी दिल्लीलाही कोरोना विषाणूचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी 6 वाजल्यापासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दिल्लीत मेट्रो तसेच इतर सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत सकाळीपासूनच शुकशुकाट दिसून येत आहे.
महाराष्ट्र आणि दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बिहारमधील शहरांमधील वर्दळ मंदावली आहे.
तर उत्तर प्रदेशमधील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेक जणांकडून भाजीपाला खरोदी केला जात असल्याचे दिसत आहे.
दक्षिण भारतातही लॉकडाऊनचा परिणाम दिसू लागला आहे. दक्षिणेकडे अनेक शहरे पूर्णपणे बंद आहेत. तसेच लागते लोकांची वर्दळही मंदावली आहे.