मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तसेच, कोरोना लॉक डाऊनकाळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांच्या सन्मानार्थ रविवारी सायंकाळी 5 वाजता आपआपल्या घरातून टाळ्या वाजवण्याचे आवाहनही मोदींनी जनतेला केले होते. त्यानुसार नागरिकांना प्रतिसादही दिला, सध्या सोशल मीडियावर पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टर्संचे कौतुक आहे. त्यानंतर, मोदींनी आज पुन्हा देशवासियांना संबोधित केले आहे. पुढील २१ दिवस देशात लॉक डाऊन राहणार असल्याचे सांगत देशावासियांसाठी हा निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले. तसेच, जान है तो जहान है... असे म्हणत नागरिकांनी घरीच राहण्याचे आवाहन मोदींनी जनतेला हात जोडून केले. तर, देशाला याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल, असेही मोदींनी सांगितले.
जनता कर्फ्युदिनी नागरिकांनी सायंकाळी ५ वाजता दाखवलेल्या अतिउत्साहाबद्दल मोदींनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली होती. तसेच, लोकांनी अद्यापही कोरोनाला गंभीरतेनं घेतलं नसल्याचं सांगत मोदींनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर, आज पुन्हा एकदा मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधला आहे. त्यात, पुढील २१ दिवसांसाठी देशात लॉक डाऊन करण्यात येत असल्याचे मोदींनी जाहीर केले. आज रात्री १२ वाजल्यापासून हा लॉक डाऊन करण्यात येत असल्याचे मोदींनी सांगितले. हे २१ दिवस जर आपण नाही सांभाळले तर आपला देश २१ वर्षे मागे जाऊ शकतो. कोरोनाच्या संकटाची किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीत याचा मोठा विपरीत परिणाम होणार आहे. केंद्र सरकारकडून कोरोनाच्या प्रादुर्भाव संकटासाठी, देशातील आरोग्यसेवेला गरज म्हणून १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केलीय, असेही मोदींनी सांगितले.
सोशल डिस्टन्सी फक्त रुग्णांसाठी नसून प्रत्येक नागरिकासाठी आहे, देशाच्या पंतप्रधानांसाठीही आहे. निष्काळजीपण जर असाच राहिला तर देशाला मोठी किंमत चुकवावी लागेल. देशातील अनेक भागात लॉक डाऊन करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला गंभीरतेनं घेतलं पाहिजे. आज रात्री १२ वाजल्यापासून देशात लॉक डाऊन करण्यात येत आहे, असे मोदींनी जाहीर केले. हा लॉक डाऊन जनता कर्फ्युचं पुढील पाऊल आहे. या लॉक डाऊनची आर्थिक किंमत देशाला मोजावी लागणार आहे. मात्र, देशातील प्रत्येक भारतीयाला वाचवणे हीच माझी, भारत सरकारची, राज्य सरकारची आणि स्थानिक संस्थांची प्राथमिकता असल्याचं मोदींनी म्हटलं. तसेच, मी हात जोडून सर्वांना विनंती करतोय, सध्या तुम्ही जिथं आहात तिथंच राहावे. पुढील २१ दिवसांसाठी हा लॉक डाऊन राहणार आहे, असे मोदींनी म्हटले आहे.