कॅनडामध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याचा धोका वर्तवला जात आहे. देशाच्या मुख्य सार्वजनिक आरोग्य अधिकारी डॉ. थेरेसा टॅम यांनी म्हटले आहे, की उन्हाळ्याच्या अखेरीस देशात कोरोना व्हायरस महामारीची चौथी लाट येऊ शकते. यामागचे मुख्य कारण कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आहे. याशिवाय, देशातील निर्बंध लवकर उठविणे आणि पुरेशा लोकांचे लसीकरण न होणे हेही या मागचे मुख्य कारण ठरू शकेल, असेही टॅम यांनी म्हटले आहे. ( CoronaVirus in the world danger of fourth wave in canada )
टॅम यांनी सांगितले, की लसीकरणाने रुग्णालयात भरती होणे आणि मृत्यू दर कमी करण्यास हातभार लावला आहे. मात्र, रुग्णालये आणि आरोग्य व्यवस्थेला दबावातून पूर्ण पणे बाहेर काढण्यासाठी लसीकरणात आणखी वृद्धी होणे आवश्यक आहे.
टॅम यांनी, तरूण वयस्कांचे लवकरात लवकर पूर्णपणे लसीकरण करण्याचा आग्रह केला आहे. तसेच, या वयोगटातील लोकांत लसीकरणाच्या बाबतीत देश मागे पडत आहे. कॅनडातील 63 लाख लोकांना लसीचा पहिला डोस आणि 50 लाख लोकांना दुसरा डोस मिळालेला नाही, असेही टॅम यांनी म्हटले आहे.
कांजण्यांप्रमाणे वेगाने पसरतोय करोना -कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा अधिक गंभीर आहे. तो अक्षरशः कांजण्यांप्रमाणे पसरत आहे. अमेरिकन आरोग्य प्राधिकरणाच्याअंतर्गत दस्तऐवजाचा हवाला देत, मिडिया रिपोर्ट्समध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. कोरोना लसीकरण झालेले आणि एकही लस न घेतलेल्या दोन्ही गटाकडून या व्हायरसचा प्रसार केला जाऊ शकतो, असे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अर्थातच सीडीसीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्या लोकांनादेखील विशेष काळजी घेण्याची गरज आहे. द वॉशिंग्टन पोस्टनेदेखील याबाबतचे वृत्त दिले आहे.