नवी दिल्ली : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसची (Coronavirus 3rd Wave) तिसरी लाट आल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta Plus Varient) वेगाने पसरत आहे. त्यामुळे सध्या अनेक तज्ज्ञ लसीचा तिसरा डोस म्हणजेच 'बूस्टर शॉट' (Booster Shot) याबाबत चर्चा करत आहेत. लसीच्या तिसऱ्या डोसमुळे कोरोनाचा संसर्ग बऱ्याच काळापर्यंत थांबविला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे, सद्यपरिस्थितीत कोरोना लसीच्या बूस्टरची गरज नसल्याचेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला फायझरने म्हटले होते की, अमेरिका आण युरोपातील अधिकाऱ्यांकडून फायझर लसीच्या तिसऱ्या डोससाठी परवानगी मागणार आहोत. लसीच्या तिसऱ्या डोसमुळे लोकांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी जास्त इम्युनिटी वाढेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच, लसीचे दोन डोस कमीतकमी 6 महिन्यांपर्यंत लोकांना कोरोना संक्रमणापासून वाचवू शकतील, असेही कंपनीकडून म्हटले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारीकोरोनाचे नवीन व्हेरिएंट आल्याने या लसीचा परिणाम थोडा कमी होईल, असा युक्तीवाद कंपनीने केला आहे. व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फौसी यांनी मंगळवारी 'सीएनबीसी'ला सांगितले की, फाइझर / बायोएन टेकचा तिसरा डोस देणे, ही योग्य तयारी (त्या परिस्थितीसाठी) आहे. ज्यामध्ये आपल्याला बूस्टरची आवश्यकता असेल. तसेच, हे आवश्यक आहे की, पहिल्यांदा प्रत्येकाने दोन डोस घेतले पाहिजे, असे अँथनी फौसी म्हणाले.
मेडिकल एजन्सींचे मत काय?लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा लोकांसाठी मेडिकल एजन्सी संस्था तिसऱ्या डोसची शिफारस करेल, असे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. युरोपियन मेडिसीन एजन्सी आणि युरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे म्हणणे आहे की, तिसऱ्या डोसची गरज आहे की नाही हे सांगणं आता खूप घाईचे ठरेल. लसीपासून संरक्षण किती काळ टिकेल हे समजण्यासाठी अद्याप लसीकरण मोहिमेचा आणि चालू असलेल्या अभ्यासाचा पुरेसा डेटा उपलब्ध नाही, असे मेडिकल एजन्सींनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
इस्त्रायल आणि फ्रान्समध्ये तिसऱ्या डोसची चर्चाजगातील काही देशांमध्ये लोक लसीचा तिसरा डोसही घेत आहेत. इस्त्रायलने म्हटले आहे की, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना लसीचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात येईल. ज्या लोकांचे अवयव प्रत्यारोपण झाले आहे किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, अशा लोकांना ही लस दिली जाईल. याशिवाय, फ्रान्समधील काही लोकांना बूस्टर डोसही दिले जात आहेत. अलीकडील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, दोन डोस पुरेसे नव्हते. इतकेच नव्हे तर यापूर्वी फ्रान्सनेही म्हटले होते की सप्टेंबरपासून वृद्धांना बूस्टर डोस दिला जाईल, असे फ्रान्सच्या लस समितीने मे महिन्यात सांगितले.