हैदराबाद – अनेकदा आपण सासू-सून यांच्यातील भांडण ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. टीव्हीवरील अनेक मालिकांचा विषयही सासू-सून यांच्या नात्याभोवती फिरत असतो. सासू सून यांच्यातील भांडण कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. पण सासू-सून या वादाला वेगळचं वळण लागल्याचं चित्र हैदराबादमध्ये पाहायला मिळालं. सुनेचा बदला घेण्यासाठी कोरोनाबाधित असलेल्या सासूनं तिला घट्ट मिठी मारल्याचा विचित्र प्रकार घडला आहे.
सुनेलाही कोरोनाची लागण व्हावी या उद्धेशाने सासूने तिला मिठी मारली अन् झालंही सासूच्या मनासारखं. सुनेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सासूने तिला घराबाहेर काढलं आहे. तेलंगणातील एका जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित सून ३ वर्षापूर्वी कामारेड्डीमधील युवकासोबत लग्न करून सासरी आली होती. काही दिवसांपूर्वी सासूला कोरोनाची लागण झाली. तिला होम क्वारंटाईनमध्ये ठेवलं होतं. या काळात घरातील सूनेने सासूपासून काही अंतर पाळलं.
कोरोना नियमांचे पालन करत सूनेने सासूपासून सोशल डिस्टेंसिंग राखलं नेमकं हेच सासूला खटकलं. सूनेचं वागणं सासूला सहन झालं नाही. हाच राग मनात ठेऊन सासूनं सुनेला आणि नातवालाही मिठी मारली. त्यानंतर सूनेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. जे सासूच्या मनात होतं ते घडल्याने सासूही भलतीच खुश झाली. तिनं सूनेचा बदला घेण्यासाठी तिला घराबाहेर काढलं. त्यानंतर पीडित सुनेच्या बहिणीनं हा प्रकार सगळ्यांसमोर उघड केला तेव्हा ऐकणाऱ्यांना धक्काच बसला.
सासूने बाहेर हाकलल्यानंतर पीडिता बहिणीच्या घरी गेली आणि तिथे होम क्वारंटाईन झाली. बहिणीने योग्य ती खबरदारी घेत आवश्यक ती व्यवस्था केली. पीडित महिलेचा पती ओडिसामध्ये असल्याने त्याला पत्नीच्या अशा अवस्थेत मदतही करता आली नाही. पैसे कमवण्यासाठी पती ओडिसाला राहत असल्याचं कळालं आहे.
लसीकरण मोहिमेला यश आणण्याचे प्रयत्न
गेल्या महिन्यात देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १.२ लाखांहून अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात एकूण १.७ लाख लोकांचा मृत्यू झाला. तिसऱ्या लाटेसाठी योग्य तयारी केल्यास हाच आकडा ४० हजारांपर्यंत आणता येईल. दुसऱ्या लाटेदरम्यान प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांचं प्रमाण २० टक्के होतं. तिसऱ्या लाटेदरम्यान ते ५ टक्क्यांवर राहिल्यास जीवितहानी मोठ्या प्रमाणात टाळता येईल, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यासाठी आरोग्य सुविधा उभारण्यावर आणि लसीकरण मोहिमेला गतीमान करण्यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे.