मुंबई - रामायण आणि महाभारत या मालिकांना नव्वदीच्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या मालिका सुरू असताना लोक आपापल्या घरातच थांबत असत. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट असायचा. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने आपल्याला सगळीकडेच अतिशय शांत वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमुळे लोकांना रामायण आणि महाभारत या कार्यक्रमांची आठवण आली आहे. रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिकांचे या काळात पुन्हा प्रक्षेपण केले जावे अशी मागणी सोशल मीडियावर होत होती आणि आता तर प्रेक्षकांना शनिवारपासून रामायण ही त्यांची आवडती मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळाली. मात्र, मोदी सरकार आणि भाजपा सरकार या मालिकांच्या प्रक्षेपणाचे श्रेय घेत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी ट्विटरवरुन या मालिकांचं श्रेय हे राजीव गांधींच असल्याचं म्हटलंय.
रामायण मालिका शनिवारी सकाळी सुरु झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या घरात रामायण मालिका पाहात असल्याचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला होता. मात्र, नेटीझन्सने ट्विटरवरुन त्यांच्या या फोटोवर, देशातील सद्यपरिस्थीचा उहापोह केला. तसेच, केंद्रीयमंत्र्यांनी देशातील स्थितीकडे लक्ष द्यावे, कार्यालयीन बैठका घरात घ्याव्यात, रामायण काय पाहता, असे म्हणत जावडेकर यांना चांगलेच सुनावले. त्यानंतर, जावडेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरील रामायण पाहतानाचा फोटो डिलिट केला. मात्र, भाजपा नेत्यांकडून या मालिकांचे प्रमोशन करण्यात येत असून याच्या पनप्रक्षेपणाचे श्रेय लाटण्यात येत आहे. यावरुन दिग्विजय सिंह यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला टार्गेट केलंय. तसेच, देशाचे माजी पंतप्रधान आणि दिवंगत नेते राजीव गांधींच्या सांगण्यावरुनच रामानंद सागर यांनी रामायण मालिकेची निर्मित्ती केली होती, असे सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन म्हटलंय.
दरम्यान, महाभारत या मालिकेला इतकी वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. बी.आर.चोप्रा आणि रवी चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत नितीश भारद्वाज, मुकेश खन्ना, गजेंद्र चौहान, प्रवीण कुमार, अर्जुन, पुनीत इस्सार, पंकज धीर, गुफी पेंटल आणि रुपा गांगुली यांच्या मुख्य भूमिका होत्या. आज इतक्या वर्षांनी देखील प्रेक्षक या मालिकेतील कलाकारांना खऱ्या नावाने नव्हे तर या मालिकेतील व्यक्तिरेखांच्या नावानेच ओळखतात. कदाचित, त्यामुळेच जावडेकर यांनी रामायण पाहतानाचा फोटो ट्विटरवर अपलोड केला होता.