नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. आतापर्यंत देशभरात 2902 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 68 जणांचा मृत्यू झाला, तर 183 जण बरे होऊन घरी परतले आहेत. विशेष म्हणजे, एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातशी संबंधित असून 17 राज्यांतील 1023 तबलिगी जमातशी संबंधित असलेल्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती, आरोग्यमंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. दिल्लीतील निझामुद्दीन येथे तबलिगी समाजाकडून मोठ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील अनेक लोकांना कोरोना विषाणूची लागण झालेली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तबलिगी समाजाचे मौलाना साद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दिल्लीच्या निझामुद्दीनस्थित तबलिगी जमातचे मौलाना मोहम्मद साद यांना क्राईम ब्रँचने नोटीस बजावली होती. क्राईम ब्रँचचे पथकाने मरकजसंबंधी 26 प्रश्नांची उत्तरे मागितली. दरम्यान, मौलाना साद यांच्या शोधासाठी पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. एका दिवसापूर्वी मौलाना साद यांनी आपला एक ऑडिओ क्लिप जारी केली होती. त्यात त्यांनी आपण आयसोलेशनमध्ये असल्याचे सांगितले. आता मौलाना साद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, निजामुद्दीने येथे दिल्ली क्राईम ब्रँचचे पथक दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. १ एप्रिल रोजी मरकझ येथून जवळपास २३०० मुस्लीमांना बाहेर काढण्यात आले दरम्यान, निजामुद्दीन येथे फॉरेन्सिक लॅबचे पथकही चौकशीसाठी दाखल झाले आहे.
दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्यांपैकी तब्बल 58 रुग्ण सध्या अत्यवस्थ आहेत. हे सर्वजण केरळ, मध्य प्रदेश आणि दिल्लीतील आहेत. ज्या 17 राज्यांत तबलीगी जमातशी संबंधित कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. तेथे प्रामुख्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची प्रक्रिया सुरू आहे. घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र, कोरोनाविरोधातील लढाईसाठी जागरूक होण्याची आवश्यता आहे. आम्ही कोरोना टेस्टिंगची क्षमता सातत्याने वाढवत आहोत, असे अग्रवाल म्हणाले. तर, गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले, की तबलिगी जमातचे सदस्य आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या 22 हजार जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.