CoronaVirus : इंदूरमध्ये पुन्हा आरोग्य पथकावर हल्ला, गुन्हेगाराकडून दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 04:23 PM2020-04-18T16:23:43+5:302020-04-18T16:23:53+5:30
CoronaVirus : कोरोनावर मात करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना इंदूरमध्ये पुन्हा मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
इंदूर : देशात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्येही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. या कोरोनावर मात करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना इंदूरमध्ये पुन्हा मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकावर एका गुन्हेगाराने दगडफेक केली. तसेच, त्यांच्याकडील मोबाईलची तोडफोड केली. या घटनेनंतर आरोग्य कर्मचारी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि याबाबत तक्रार दाखल केली आहे.
या सर्व्हे पथकात डॉक्टर, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्ते सामील होते. सर्व्हेचे प्रभारी आणि आयुर्वेदिक डॉक्टर प्रवीण चौरे यांनी या घटनेबाबत दुजोरा दिला आहे. प्रवीण चौरे यांनी सांगितले की, "पलसिया भागातील विनोबानगरमध्ये आमचे पथक सर्व्हे करण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी पारस यादव या गुन्हेगाराने आमच्या पथकावर हल्ला केला. यादरम्यान या भागातील काही लोक पथकाचा बचाव करण्यासाठी आले. मात्र, पारस यादवने त्यांच्यावरही हल्ला केला. आमच्या पथकावर त्याने दगडफेक केली आहे. तसेच, त्याने पथकातील एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मोबाईल फोन तोडला आहे."
पारस यादव नावाचा गुन्हेगार राहत असलेल्या विनोबा नगरमधील ही घटना आहे. यापूर्वी त्याच्यावर दारू विकल्याचा आरोप आहे. पारस यादव ज्यावेळी शेजार्यांशी भांडत होता. त्यावेळी त्याठिकाणी सर्वेक्षण करण्यासाठी गेलेले आरोग्य पथक मोबाईलवरुन त्यांचे काम करत होते. मात्र, पारस यादवला वाटले की हे लोक व्हिडिओ काढत आहेत. त्यानंतर त्याने आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली आणि त्यांचा मोबाइल तोडला. या घटनेनंतर आरोग्य कर्मचार्यांनी पोलिसांना माहिती दिली, असे पलासियाचे टीआय विनोद दीक्षित यांनी सांगितले.
दरम्यान, याआधीही कोरोनाविरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर इंदूरमध्ये हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत.