नवी दिल्ली : कोरोना बाधितांची संख्या भारतात सध्या ज्या गतीने वाढते आहे, ती गती अशीच राहिल्यास मे महिन्याच्या मध्यापर्यंत ही संख्या एक लाख ते १३ लाखांपर्यंत होऊ शकते. परिणामी, भारतासमोर गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असा इशारा वैज्ञानिकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने आपल्या अहवालात दिला आहे.या अहवालात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात अन्य देशांच्या तुलनेत भारताने चांगले नियंत्रण ठेवल्याचे दिसते. मात्र, या रुग्णांचा आढावा घेताना काही महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामध्ये कोरोनाची चाचणी, त्या चाचणीची अचुकता, कोरोनाचा संसर्ग झाला आहे मात्र त्यांची लक्षणे दिसलेली नाहीत, अशा रुग्णांचे तपासणीचे परिमाण यांचा समावेश आहे, असे अमेरिकेतील जॉन्स हापकिन्स विद्यापीठाच्या देबश्री रॉय यांच्यासह संशोधकांच्या या पथकाने म्हटले आहे. मोठ्या प्रमाणात तपासणीच होत नसल्याने आतापर्यंत भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्याने समाजात किती शिरकाव केला आहे, हे सांगणे अशक्य आहे. हेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले, तर रुग्णालये आणि आरोग्य सुविधांच्या बाहेर असलेले कितीजण बाधित आहेत, याचा अंदाज कसा लागणार, असेही या अहवालात म्हटले आहे.
Coronavirus : भारतासाठी गंभीर इशारा, वैज्ञानिकांचा अहवाल; मे मध्ये कोरोनाबाधित १३ लाखांपर्यंत ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 2:12 AM