चंढीगड - देशात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, सोमवारी पंजाबमधील नंगल येथे संचारबंदी असतानाही लोकांची मोठी गर्दी जमा जाली होती. पंजाब-हिमाचल बॉर्डवर लोक बॉर्डर पार करण्यासाठी एकत्र आले होते. हिमाचल प्रदेशच्या सरकारने हिमाचली नागरिकांना आणण्यासाठी ऑनलाईन पास जारी केले आहेत. मात्र, पंजाब सरकारसोबत यासंदर्भात योग्य ताळमेळ नसल्याने सीमारेषेवर गोंधळ उडाला. कारण, नंगर सीमारेषेवर हजारो लोकं एकत्र जमा झाले होते.
घरवापसीच्या उत्साहात हिमाचली नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासल्याचे दिसून आले. त्यामुळे, येथील पोलीस कर्मचाऱ्यांना परिस्थिती हाताळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागला. हिमाचल सरकाने ऑनलाईन पास जारी केल्याने रविवारी रात्रीपासूनच सीमारेषेवर लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. सकाळ होताच, हजारोंच्या संख्येने नागरिक येथे पोहोचल्याने गोंधळ उडाला. तेथील स्थानिक पोलिसांनाही या घटनेचा आणि लोकांच्या गर्दीचा अंदाज आला नाही. मात्र, लोकांची संख्या पाहून पोलिसांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. यावेळी, नागरिका आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.
सीमारेषेवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या, तर सोशल डिस्टन्सिंगचे कुठेही पालन होताना दिसत नव्हते. येथे पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आले होते. या पथकांकडून प्रत्येक नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात येत होती. मात्र, गर्दीमुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं दिसून आलं. याचा त्रास पोलीस आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहन करावा लागला. दुसरीकडे चंढीगड येथूनही मोठ्या प्रमाणात हिमाचली नागरिकांना परत पाठविण्यात आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चंढीगड येथे अडकलेल्या हिमाचली विद्यार्थ्यांसाठी सरकारने गाड्या पाठवल्या होत्या, त्यातून त्यांनी घरवापसी करण्यात आली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील बांद्रा येथेही अशाच प्रकारे गर्दी जमा झाली होती. परप्रांतीय नागरिकांनी आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती. यावेळी २ त ३ हजार लोकं एकत्र जमले होते. अखेर, पोलिसांनी सर्वांना परत पाठवले. या घटनांवरुन अद्यापही आपल्या गावी, घराकडे जाण्याची आस लावून अनेक नागरिक असल्याचे दिसून येते.