कोडरमा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सूट देत, नागरिकांच्या पोटा-पाण्याची व्यवस्था आणि या सर्वांचे नियोजन हे प्रशासनाकडे सोपविण्यात आले आहे. या काळात पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन पायाला भिंगरी लावल्यागत फिरत आहे. मात्र, शेवटी प्रशासनात काम करणाराही माणूसच आहे. त्यालाही कुटंब आहे. त्यामुळे, पोलीस व प्रशासनातील कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यत सर्वांच्याच कुटुंबीयांना त्यांच्या घरातील व्यक्तींची काळजी आहे. झारखंडमधील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्रपुत्र रमेश घोलप यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत लढताना कुटुंबातील व्यक्तींमध्ये असलेली भीती आणि चिंता आपल्या शब्दातून व्यक्त केली.
जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी भावूक पोस्ट आपल्या फेसबुक अकाऊंवरुन शेअर केली आहे. त्यामध्ये, त्यांच्या दोन चिमुकल्यांना असलेली वडिलांची काळजी आणि वडिलांसोबत नेहमीप्रमाणे नसलेला सहवास व्यक्त केल्याचं दिसून येत आहे. ५ वर्षांचा अक्षित आणि ४ वर्षांचा दिगंत वडिलांच्या काळजीने कोरोना कधी जाणार वो डॅड्डा असं म्हणतोय. आपल्या दोन्ही चिमुकल्यांचे हे शब्द एका जिल्हाधिकारी साहेबांमधील बापमाणूस जागा करत आहेत. यावरुन, रमेश घोलप यांनी शब्दातून या भावना मांडल्या आहेत.
''हल्ली ऑफिस मधून घरी आलं, की या बकेट स्वागत करतात. 'डॅड्डा आलाऽऽ... डॅड्डा आलाऽऽ'.. म्हणत धावत येऊन मिठी मारणारे अक्षित आणि दिगंत मी घराबाहेर बसून अंघोळ करताना घरातून डोकावून पाहतात. रोज ऑफिस मधून डॅड्डा येणार म्हटल्यावर मम्मा आम्हाला घरात बंद का करते? मी रोज ऑफिस मधून आल्यावर पण अंघोळ का करतो? मी घरात बाथरूममध्ये अंघोळ न करता घराबाहेर का करतो? या सर्व प्रश्नांना 'बाळा, बाहेर कोरोना आला आहे ना?म्हणून!' असं एकच उत्तर त्यांना मम्माकडून मिळत असतं.
अंघोळ करून मी घरात आलो की मग दोघांचाही निरागस प्रश्न असतो, 'डॅड्डा, कधी जाणार कोरोना?' ..तेंव्हा या लढाईत लढणारे सर्व डॉक्टर्स, पोलिस, शासन, प्रशासन आणि त्यांना साथ देणारी जनता या सर्वांना आठवत माझं विश्वासानं दिलेलं उत्तर असतं, 'बाळा, लवकरच!' लोकहो, कित्येक दिवस आपल्या घरातल्या लाडक्या पिल्लांना मिठी तर दूरच, पण जवळही घेऊ न शकणा-या वैद्यकीय क्षेत्रातील नर्स, डॉक्टरांचा जीव किती तुटत असेल कल्पना करा. हे सर्व तुमच्या सुरक्षेसाठी सुरू आहे. समजून घ्या आणि समजूतदार बना. " सरकार आणि प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. या लढाईत सरदार आणि सैन्य रणांगनात प्राणपणाने लढतच आहेत, मात्र ती जिंकण्यासाठी तुमचीही साथ हवीय. 'घरात बसून!'.... हो 'घरातच बसून!' ...सध्याच्या लॉकडाऊन च्या काळात घरातून अनावश्यक बाहेर पडत असाल तर तुम्ही शत्रूला साथ देत आहात हे लक्षात ठेवा.", अशी भावूक फेसबुक पोस्ट घोलप यांनी आपल्या अकाऊंटवरुन शेअर केली आहे.
रमेश घोलप हे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी असून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही त्यांच्या कार्याचं कौतुक केलंय. कोरोना लढाईच्या काळात आपल्या जिल्हा प्रशासनातील पोलीस आणि सहकारी कर्मचाऱ्यांसोबत ते स्वत: रस्त्यावर उतरुन काम करत आहेत. तसेच, लोकांना रस्त्यावर न येण्याचं सांगत, घरातच बसण्याचंही आवाहन त्यांच्याकडून सातत्याने होत आहे. जिल्हाधिकारी म्हणून आपल्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव न होऊ देणे ही त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मात्र, जिल्ह्याची जबाबदारी घेताना, घरातील वडिल कुठतही हरवल्याची खंत कुटुबीयांना होतेयं. म्हणून, आपल्या चिमुकल्यांच्या आर्त हाकेने बापमाणूस भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, माझ्याप्रमाणेच अत्यावश्यक सेवा देत आपलं कर्तव्य बजावणाऱ्यांच्या कार्याचंही त्यांनी कौतुक केलंय. यावरुन नागरिकांनी निदान घरातच बसावं, हेच कोरोनाला लवकरात लवकर घालवण्याच शस्त्र असून आपल्या कुटुबींजवळ जाण्याचा मार्ग असल्याचं त्यांनी सांगितलंय.