नवी दिल्ली: गेल्या सलग तीन दिवसांपासून भारतातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांवर जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भयंकर परिणाम दिसून येत आहे. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स या सर्वांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) या परिस्थितीवर भाष्य केले आहे. देशात कोरोनाचे गंभीर संकट असताना काही भारत विरोधी शक्तींकडून फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे मत संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केले आहे. (dattatreya hosabale says anti-India forces can take advantage of adverse circumstances)
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दत्तात्रेय होसबळे यांनी भाष्य केले आहे. कोरोनाची दुसरी लाट खूपच भयंकर आणि भयावह आहे. देशाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनामुळे पुन्हा एकदा देशासमोर आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे, असे सांगत समाजाची गरज ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाचा विविध भागात कार्यरत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
देशविरोधी शक्ती फायदा घेण्याच्या प्रयत्नात
कोरोनाच्या या प्रतिकूल परिस्थितीचा देशविरोधी शक्ती फायदा घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असून, देशात नकारात्मक आणि अविश्वासाचे वातावरण तयार केले जाऊ शकते, असे होसबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. देशविरोधी शक्तींना ओळखून त्यांपासून सावध राहावे, असा सल्लाही होसबळे यांनी यावेळी दिला. परिस्थिती बिकट असली, तरी समाजाची शक्त कमी नसते. संकटांशी झगडण्याची आपली क्षमता जगाला माहिती आहे. धैर्य आणि मनोबल कायम ठेवून संयम, शिस्त आणि परस्पर सहयोगाने आपण या भीषण परिस्थितीवर नक्की मात करू, यावर आमचा विश्वास आहे, असेही होसबळे यांनी म्हटले आहे.
“तुमच्याकडून फेक न्यूज पसरवण्याची अपेक्षा नाही”; भाजपचा संजय राऊत, जयंत पाटलांना टोला
अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतेय
कोरोनाने अचानक विक्राळ रूप धारण केल्याने रुग्णालयांत बेड्स, ऑक्सिजन तसेच औषध अशा आवश्यक संसाधनांची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भारतासारख्या विशाल देशात समस्याही व्यापक रूप धारण करते. केंद्र व राज्य शासत तसेच प्रशासन, स्थानिक संस्थांच्या माध्यमातून समस्या सोडविण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहेत. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्व जण, संरक्षण तसेच स्वच्छता कर्मचारी मागील वेळेप्रमाणेच आपला जीव धोक्यात घावून आपली जबाबदारी पूर्ण करत आहेत, असेही होसबळे यांनी नमूद केले.