coronavirus: सॅनिटायझर प्यायल्याने कैद्याचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालातून उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 10:42 PM2020-03-26T22:42:29+5:302020-03-26T22:42:40+5:30
पोलिसांनी याप्रकरणी खटला दाखल करुन घेतला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युचे नेमके कारण समजले आहे.
कोची - देशात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिक मास्क आणि सॅनिटाझर्सचा वापर करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गंभीर होत आहे. देशातील आणि राज्यीतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत देशात केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, केरळमध्ये आज एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. रिमांडवर तुरुगांत बंद केलेल्या कैद्याने सॅनिटायझर प्यायल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
केरळमध्ये सॅनिटायझर प्यायल्याने एका रिमांडवर आलेल्या कैद्याचा तुरुंगातच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या कैद्याने सॅनिटायझरला दारु समजून प्राशन केले होते. त्यानंतर, त्यास जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. १८ फेब्रुवारीपासून हा कैदी रिमांडवर आल्यानंतर तुरुंगात बंद होता. रमनकुट्टी नामक या कैद्याला तुरुंगात बेशुद्ध पडल्यानंतर, मंगळवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, या कैद्याने तुरुंगात ठेवलेल्या सॅनिटाझर प्यायल्यानेच त्याचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार तुरुंगातील कैद्यांकडूनच हे सॅनिटाझर बनविण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी याप्रकरणी खटला दाखल करुन घेतला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युचे नेमके कारण समजले आहे. तुरुंगातील अधिकारी सॅनिटायझर म्हणून मुख्यत्वे आयसोप्रोपाईल अल्कोहल तुरुंगात ठेवतात. या कैद्याने दारू समजून हे सॅनिटायझर प्यायले होते.
देशात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात तर परिस्थिती फारच अवघड होताना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली असून महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ५ वर गेला आहे. तर, कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून 125 झाली आहे. देशात कोरोनाचे आतापर्यंत ७१९ रुग्ण आढळले असून यातले ६२ रुग्ण आज आढळून आहेत. त्यामुळे देशात कोरोना वेगानं हातपाय पसरत असल्याचं दिसून येतंय. कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेतल्यास महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. केरळमधील १३७ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.