नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या मुकाबल्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 600 हून अधिक झाली आहे. तर आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. लष्कर व केंद्रीय निमलष्करी दलाने कोरोनाग्रस्तांसाठी 2000 पेक्षा जास्त बेडची व्यवस्था केली आहे, तसेच हिमाचल प्रदेशात हमीरपूर जिल्हा प्रशासनाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वसतिगृहातील 2000 खोल्या रुग्णांसाठी घेतल्या आहेत. याच दरम्यान दिल्लीतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिकमधील एका डॉक्टरला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
मोहोल्ला क्लिनिकमध्ये दररोज अनेक जण तपासणीसाठी येत असतात. त्यामुळे जवळपास 1000 लोकांना कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. केजरीवाल सरकारने याबाबत माहिती मिळताच परिसरातील भिंतीवर नोटीस लावली आहे. या नोटीसमध्ये 12 मार्च ते 18 मार्चपर्यंत त्या मोहल्ला क्लिनिकमध्ये उपचारासाठी किंवा तपासणीसाठी गेलेल्या रुग्णांनी स्वतः ला होम क्वारंटाइन करावे अशाप्रकारचे आवाहन करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.
‘मोहल्ला क्लिनिक, मौजपुर, दिल्ली येथील डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. जे रुग्ण 12 मार्च ते 18 मार्च या दरम्यान उपचारासाठी मौजपूर येथील त्या मोहल्ला क्लिनिकमध्ये गेले होते त्यांनी पुढील 15 दिवसांसाठी स्वतः ला होम क्वारंटाइन करावे’ अशी नोटीस केजरीवाल सरकारने भिंतीवर लावली आहे. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमध्ये दररोज जवळपास 150 ते 200 रुग्ण येत असतात. 12 ते 18 मार्च या दरम्यान एक रविवार होता, रविवारी मोहल्ला क्लिनिक बंद असते. त्यामुळे सहा दिवसांमध्ये जवळपास 1000 रुग्ण त्या मोहल्ला क्लिनिकमध्ये आले असावेत असा अंदाज आहे. त्यामुळे या रुग्णांना देखील कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी निमलष्करी दलाची देशभरातील 32 रुग्णालये सरकारने ताब्यात घेतली आहेत. त्यामध्ये 1900 खाटा आहेत. केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटियन सीमा पोलीस व सशस्त्र सीमा बलची ही रुग्णालये ग्रेटर नोएडा, हैदराबाद, गुवाहाटी, जम्मू-तेकानपूर (ग्वाल्हेर), दिमापूर, इम्फाळ, नागपूर, सिल्चर, भोपाळ, आवाडी, जोधपूर, कोलकाता, पुणे व बंगळुरू येथील ही रुग्णालये आहेत. सीमा सुरक्षा करणाऱ्या आयटीबीपीमध्ये तर देशातील सर्वांत मोठे क्वारंटाईन सेंटर चालवले जात आहे. तेथे 1000 जणांची व्यवस्था केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कोरोना व्हायरससंदर्भात नागरिकांना माहिती देण्यासाठी एक व्हॉटस्अॅप क्रमांक जारी केला आहे. 9013151515 असा तो नंबर असून, त्यावरील सेवा 24 तास सुरू असेल, असे सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : बापरे! फक्त 20 मिनिटांत एका व्यक्तीमुळे 4 जणांना कोरोनाची लागण
Coronavirus : देशभरातल्या टोलनाक्यांवरील टोलवसुली स्थगित, नितीन गडकरींनी दिला मोठा दिलासा
coronavirus : लॉकडाऊनदरम्यान भाजपाने उचलले मोठे पाऊल, रोज पाच कोटी गरिबांना देणार भोजन
Coronavirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या झाली ६०० च्या पुढे; तामिळनाडूत पहिला मृत्यू