नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दिल्लीतही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. दरम्यान, दिल्लीत गेल्या काही दिवसांपूर्वी पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर या पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या १६ लोकांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली. मात्र, या १६ लोकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे दिल्लीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची बाधा झाली होती. कोरोनाची बाधा झाल्यानंतरही या पिझ्झा डिलिव्हरी बॉयने दक्षिण दिल्लीमधील अनेक विभागात पिझ्झा डिलिव्हर केला होता. त्यामुळे या भागातील ७२ कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आले होते. तसेच, डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या १६ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीला अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या लोकांची चिंता दूर झाली आहे.
दिल्ली प्रशासनाने अजूनही या १६ लोकांना होम क्वारंटाइन केले आहे. याशिवाय, ७२ कुटुंबीयांचेही होम क्वारंटाइन सुरुच राहील असे म्हटले आहे. याशिवाय, जर या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळून आली तर त्यांची कोरोना चाचणी केली जाईल. तसेच, सरकार या लोकांची रॅपिड अँटिबॉडी टेस्ट सुद्धा करु सकते. दिल्लीत रॅपिड टेस्टची सुरुवात आजपासून सुरु करण्यात आली आहे.
दरम्यान, देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १७ हजारहून अधिक आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत १७२६५ कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. यामध्ये ५४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २५४७ रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १५५३ नवे रुग्ण आढळले, तर ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.