नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी याबाबत घोषणा केली. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखायचा असेल तर हे २१ दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नका. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद केल्या आहेत. लोकांच्या आरोग्याला सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे असं मोदींनी सांगितले.
देशातील लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. रुग्णालयात डॉक्टर आणि रस्त्यावर पोलीस अशी परिस्थिती संपूर्ण देशभरात झाली आहे. विनाकारण घराबाहेर पडत असाल तर पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागत आहे. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.
सध्या सोशल मीडियावर दिल्ली पोलिसांनी एका युवकाला दिलेल्या हटके उत्तराची सर्वत्र चर्चा आहे. एका युवकाने दिल्ली पोलिसांना ट्विटरवरुन प्रश्न विचारला त्याला दिल्ली पोलिसांनीही तात्काळ उत्तर दिलं. या युवकाने विचारलं की, लॉकडाऊनच्या परिस्थितीत मी माझ्या मित्राला भेटायला जाऊ शकतो का? यावर दिल्ली पोलिसांनी जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्हालाही हसायला येईल.
दीपक प्याल असं या युवकाचे नाव आहे. दिल्ली पोलिसांना टॅग करुन त्याने पोस्टमध्ये लिहिलं की, सर, २ किलोमीटर अंतरावर त्याच्या मित्राचं घर आहे, कामानिमित्त त्याच्या घरी जाऊ शकतो का? त्यावर दिल्ली पोलिसांनी उत्तर दिलं जर खरा मित्र असशील तर घरातच राहा, व्हिडीओ कॉल कर अशी प्रतिक्रिया दिली. लोकांनाही दिल्ली पोलिसांनी दिलेलं उत्तर मजेशीर वाटलं.
अनेकांनी दिल्ली पोलिसांचे कौतुक केले.
देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ६५७ इतकी झाली आहे तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसागणिक कोरोनोच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. संक्रमित होणारी ही साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे १३० कोटींच्या देशात पुढील २१ दिवस कोणालाही विनाकारण घराच्या बाहेर पडता येणार नाही. काही अपवाद वगळता लोकांनी सरकारच्या नियमांचे पालन करावं अन्यथा कायदा मोडल्याप्रकरणी तुम्हाला २ वर्षापर्यंत जेलची शिक्षाही होऊ शकते असा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.