गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. परंतु काही दिवसांपासून देशात काहीशा प्रमाणात रुग्णसंख्या कमी होतानाही दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्र, दिल्ली यांसारख्या भागांना मोठा फटका बसला होता. परंतु आता त्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत आहे. दिल्लीतील पॉझिटिव्हीटी दर कमी झाल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिली. तसंच दिल्लीतील ऑक्सिजनची मागणीही कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं."दिल्लीला दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी आता कमी होऊन ५८२ मेट्रिक टन इतकी झाली आहे. आम्ही केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहिलं आहे. तसंच आता आमचं काम दररोज ५८२ मेट्रिक टन ऑक्सिजनमध्ये चालेल असं त्यांना कळवण्यात आलं आहे. आमच्या कोट्याच्या अतिरिक्त ऑक्सिजन अन्य राज्यांना देण्यात यावा असंही सांगण्यात आलं आहे. गेल्या २४ ते ४८ तासांत फार कमी प्रमाणात ऑक्सिजनच्या इमर्जन्सीसाठी फोन येत आहेत," असं सिसोदिया म्हणाले.