coronavirus: लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांना अटक, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 08:14 AM2020-05-18T08:14:39+5:302020-05-18T08:18:26+5:30
त्यांच्या सांगण्यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते गाझीपूरच्या सीमेवर असलेल्या स्थलांतरीत मजुरांना आपल्या वाहनांमध्ये घालून सीमापार घेऊन गेले, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सध्या सुरू आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी आमदार अनिल चौधरी यांना लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात गाझीपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम-१८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल चौधरी यांच्या सांगण्यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते गाझीपूरच्या सीमेवर असलेल्या स्थलांतरीत मजुरांना आपल्या वाहनांमध्ये घालून सीमापार घेऊन गेले, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नियमांनुसार पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या पगवानगीशिवाय असे करता येत नाही. तसेच लोकांना भडकवणे आणि गर्दी जमा करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, अनिल चौधरी यांना रविवारी सकाळी न्यू अशोकनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्यांच्या घरी येत स्थानबद्ध केले. तसेच पोलिसांच्या परवानगीशिवाय त्यांना घराबाहेर पडता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
निर्मला सीतारामन यांचा व्यापारी, उद्योजकांना दिलासा
देशभर ३१ मेपर्यंत लॉकडाउन; अत्यावश्यक व्यवहार वगळता सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी
शिक्षणासाठी १२ वाहिन्या, १०० विद्यापीठांतून ऑनलाइन धडे- अर्थमंत्री
या कारवाईविरोधात अनिल चौधरी यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांची ही कारवाई पक्षपाती असून, गरीब मजुरांची सेवा करण्यापासू रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच वाईट काळात गरीब मजुरांची सेवा करणे हा गुन्हा आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच आपल्यावरील कारवाई हे मानवाधिकारांचे हनन असून, या कारवाईबाबत त्यांनी भाजपा आणि आम आदमी पक्षावर आरोप केले आहेत.