नवी दिल्ली - कोरोना विषाणूने गेल्या दीड वर्षांपासून देशभरात थैमान घातले आहे. त्यातच कोरोनाचे डेल्टा आणि लेम्बडा हे नवे व्हेरिएंट समोर आल्याने तज्ज्ञ चिंतीत आहेत. कोरोनाच्या या दोन्ही व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Coronavirus in India)तसेच कोरोनाच्या या या दोन्ही व्हेरिएंटपैकी कुठला व्हेरिएंट अधिक घातक आहे, याबाबत अंदाज घेतला जात आहे. (Delta or Lambda, which variant of Coronavirus is more deadly?)
आता याबाबत माहिती देताना इंस्टिट्युट ऑफ लिव्हर अँड बायलियरी सायन्सचे संचालक डॉ. एस.के. सरीन यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात नाही आहेत. मात्र ते आहेत. डेल्टासुद्धा चिंताजनक आहे. मात्र आम्ही यावेळी लेम्बडा व्हेरिएंटबाबत अधिक चिंतीत आहोत. आपल्या देशात सध्या हा व्हेरिएंट दिसून आलेला नाही. मात्र तो येऊ शकतो.
डॉ. एस.के. सरीन यांनी सांगितले की, कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट अद्याप संपुष्टात आलेली नाही. मात्र जर कोणी पर्यटक संपूर्ण देश फिरून एखाद्या हिल स्टेशनवर गेला आणि तो तिथे विषाणू सोबत घेऊन गेला तर गर्दीमुळे असा पर्यटक सुपर स्प्रेडर ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून हिल स्टेशनांवर लोकांची गर्दी दिसून येत आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे अनेक रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम झाला आहे. डॉ. एस.के. सरीन यांनी कांवड यात्रेबाबत सांगितले की, जोपर्यंत लोक आश्वासन देत नाहीत की ते चुकीचे वर्तन करणार नाही, तोपर्यंत अशा प्रकारची यात्रा ही धोकादायक ठरू शकते.
दरम्यान, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी सांगितले की, लेम्बडा व्हेरिएंटवर लक्ष देण्याची गजर आहे. त्यासाठी त्यावर अधिक संशोधन केले जात आहे. डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे लेम्बडा व्हेरिएंटने आमच्या देशात प्रवेश केलेला नाही. आमची देखरेख ठेवणारी आयएसएसीओजी ही प्रणाली खूप प्रभावी आहे. तसेच जर हा व्हेरिएंट देशात आला तर ती याचा शोध घेईल.