जयपूर – जगभरात दहशत पसरलेल्या कोरोना व्हायरसने १७ लाखांहून अधिक लोकांना जाळ्यात ओढलं आहे तर १ लाखांहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचे ७ हजारांहून जास्त रुग्ण आढळले आहेत तर २३० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अशातच कोरोनाच्या लढाईत राजस्थानच्या भिलवाडा गावाचा पॅटर्न नावारुपाला आला.
भिलवाडा गाव देशातलं पहिलं कोरोना हॉटस्पॉट होतं. मात्र आता इथली परिस्थिती सुधारली आहे. या गावात गेल्या ८ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळून आला नाही तर सुरुवातीच्या २७ रुग्णापैकी १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भिलवाडाचं कौतुक करत देशभरात भिलवाडा पॅटर्न राबवण्यासाठी माहिती मागवली आहे. कोरोना पूर्णपणे रोखण्यास भिलवाडा गावाला यश आलं. प्रशासनाने संपूर्ण सक्तीने याठिकाणी स्किनिंग केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. त्यामुळे याचं श्रेय लाटण्यासाठी अनेकांनी उडी घेतली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकार आणि राहुल गांधी यांना या लढाईचं श्रेय दिलं त्यामुळे भिलवाडाच्या देवरिया गावच्या सरपंच किस्मत गुर्जर या नाराज झाल्या. त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सोनिया गांधीच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. किस्मत गुर्जर म्हणतात की, आज जो भिलवाडा पॅटर्न प्रसिद्ध झालाय त्याच्यामागे शेतकरी, महिला, गावकरी आणि भिलवाड्यातील स्वयसेवी संस्था यांची मेहनत आहे. मागील काही दिवसांपासून राज्य सरकार यांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या लोकांनी कोरोनाशी लढण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले, याठिकाणी लोकांनी फक्त लॉकडाऊनचं पालन केले नाही तर सोशल डिस्टेंसिग आणि स्वच्छतेचीही काळजी घेतली. ही वेळ राजकीय स्वार्थ साधण्याची नव्हे तर सतर्कता आणि संयम ठेवण्याची आहे असं त्या म्हणाल्या.
काय आहे भिलवाडा पॅटर्न?
भिलवाडा पॅटर्न हा आरोग्य विभाग, पोलीस आणि प्रशासन यांच्या संयुक्त सुसंवादाचा एक चांगलं उदाहरण आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सर्व मेडिकल कॉलजमध्ये आरआरटीचं गठण केले होते. भिलवाडा जिल्हाधिकारी राजेंद्र भट यांच्या नेतृत्वात आरआरटी काम करत होती. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडताच तातडीने आरआरटी(Rapid Response Team) त्या परिसरात पाठवली जात होती. १, ३ आणि ५ किमी परिसरात कर्फ्यू आणि महाकर्फ्यू लावला जात असे. प्रत्येक घरातील सदस्यांची २ ते ३ वेळा स्क्रिनिंग केली जात होती. जर कोणामध्ये लक्षण आढळले तर १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जात असे. आयसोलेशन वार्डमध्ये ठेवलं जात असे. मोठ्या प्रमाणात संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात. अशाप्रकारे काम केल्यामुळे गेल्या ८ दिवसात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नाही.