नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशाला मोठ्या आर्थिक पॅकेजची गरज असल्याचं म्हटलं जात होतं. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पॅकेजमध्ये सर्व घटकांचा विचार करण्यात आल्याचं मोदी म्हणाले. या पॅकेजमुळे भारत स्वावलंबी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजवरुन काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचं दिसून आलं आहे. देशातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीला उपस्थित असलेले काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोदींच्या पॅकेजचं स्वागत केलं. 'मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजची बरीच प्रतीक्षा होती. देर आए दुरुस्त आए. आम्ही याचं स्वागत करतो. याबद्दलचा तपशील समजल्यानंतर कोणत्या क्षेत्रांना किती लाभ मिळेल ते कळू शकेल,' असं गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनीदेखील मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजचं स्वागत केलं आहे. 'मोदींनी योग्य वेळी २६६ बिलियन अमेरिकन डॉलरचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. याची योग्य अंमलबजावणी झाल्यास निर्माण झालेल्या संकटावर मात करता येईल. यामुळे जागतिक पुरवठा साखळीत भारत प्रमुख भूमिका बजावेल. याशिवाय मेक इन इंडियाची क्षमतादेखील वाढेल,' असं ट्विट देवरा यांनी केलं आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मात्र मोदींच्या पॅकेजवरून कडाडून टीका केली आहे. 'माननीय मोदीजी, तुम्ही देशाला संबोधित करून माध्यमांना हेडलाईन तर दिलीत, पण देशाला मदतीच्या हेल्पलाईनची प्रतीक्षा आहे. आश्वासनं प्रत्यक्षात येण्याची वाट पाहायला हवी,' अशा शब्दांत सुरजेवालांनी मोदींवर टीका केली. 'घरवापसी करत असलेल्या लाखो प्रवासी मजुरांना दिलासा देण्याची, त्यांच्या जखमांना मलम लावण्याची, त्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता होती. तुम्ही याबद्दलची घोषणा कराल अशी अपेक्षा होती,' असं सुरजेवालांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनीदेखील मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजवर टीका केली. 'मोदींचं पॅकेज म्हणजे हेडलाईन हंटिंग आहे. त्यांनी २० लाख कोटींचा आकडा जाहीर केला. पण काहीच तपशील दिला नाही,' अशा शब्दांत तिवारींनी आर्थिक पॅकेजवरुन मोदींना लक्ष्य केलं.