मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या महिन्यात लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी २१ दिवस देश लॉकडाऊन करत असल्याचं मोदींनी जाहीर केलं. मात्र, देशातील अनेक भागात या लॉकडाऊनचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील निजामुद्दीन येथे चक्क मोठा धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात तलबिगी जमातच्या कार्यक्रमाला राज्य सरकारने परवानगी नाकारली. मग, दिल्लीतील कार्यक्रमाला केंद्र सरकारने परवानगी का नाकारली नाही, असा सवाल देशमुख यांनी विचारला आहे.
निझामुद्दीन मरकजवरुन परतलेल्या १३५० तबलिगींची माहिती प्रशासनाकडे आहे. मात्र, अद्याप ५० जण नॉट रिचेबल असल्याचं त्यांनी सांगितलं. 'दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेले १४०० जण राज्यात आले. यातील साडे तेराशे तबलिगींशी संपर्क साधण्यात यश आलंय. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत. मात्र अजूनही ५० जण नॉट रिचेबल आहेत. त्यांनी फोन बंद केले आहेत. या व्यक्तींनी स्वत:हून पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करावं. आम्ही त्यांच्या आवश्यक चाचण्या करू. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास आमचं प्राधान्य आहे,' असं देशमुख यांनी सांगितलं. लपून बसलेल्या ५० तबलिगींनी शासनाला सहकार्य करावं. अन्यथा आम्ही त्यांना शोधून काढू आणि कारवाई करू, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे. तसेच, दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे देशात आणि राज्यात वाढ झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांबद्दल बोलताना, केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल त्यांनी संताप व्यक्त केलाय.
मुंबईतील वसई येथे १५ आणि १६ एप्रिल रोजी जवळपास ५० हजार तबलिगी एकत्र जमणार होते. मात्र, राज्य सरकार आणि गृहविभागाने परवानगी नाकारली. प, केंद्र सरकारने दिल्लीतील कार्यक्रमाला परवानगी कशी दिली ? असा प्रश्न देशमुख यांनी विचारला आहे. राज्यात आणि देशात जो कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, त्यास केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? असा सवालही देशमुख यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि दिल्ली पोलीस आयुक्तांनी या विषयावर बोलायचं का टाळलं ? डोवाल यांना भेटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मौलाना कुठं गायब झाले, मौलाना आता कुठं आहेत? असे प्रश्न विचारत, तबलिगीशी संबंध तुमचे! असा प्रश्नार्थक आरोपही देशमुख यांनी केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयावर केला आहे.