नवी दिल्ली - भारतात कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ४,४२१ वर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. मंगळवारी ३५४ नव्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहितीआरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली होती. तसेच आतापर्यत ११४ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. या संकटात पावलो-पावली माणूसकीचे दर्शन होत आहे, तर कुठे माणूसकीला काळीमा फासणारीही घटना घडत आहे.
देशात कोरोनामुळे मृत झालेल्या ६३ टक्के रुग्णांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. तसेच ८६ टक्के रुग्णांना मधुमेह, हृदयाचे आजार आणि हायपरटेन्शन यांसारखे आजार होते असं निर्दशनास आले. मात्र, अद्यापही कोरोनाग्रस्तांच्या मृत्युबद्दल समाजात मोठी भिती पसरली आहे. त्यामुळे, या मृतांच्या अंत्यसंस्कारासाठीही समस्या उद्भवत आहेत. मात्र, पंजाबच्या अमृतसर येथे चक्क कुटुंबीयांनीच कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृतदेह घेण्यास नकार दिल्याचं समोर आलं आहे. संबंधित व्यक्ती निगम सुपरिटेंडेंट होती. मात्र, कुटुंबीयांनी या व्यक्तीचा मृतदेह घेण्यास चक्क नकार दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी शिवदुलार सिंह ढिल्लो यांनी जसविंदर सिंह यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी प्रशासनाकडे सोपवली. त्यानुसार, एसडीएम विकास हिरा, एसीपी जसप्रीत सिंह, तहसीलदार अर्चना आणि एसएचओ गुरुन्द्रसिंह यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी स्विकारली.
शहरातील गुरुद्वारा श्री शहीदां साहिबजवळील स्मशानभूमीत शीख धर्म परंपरेनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे पटवारी आणि निगम कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मृतदेहाला खांदा दिला. तर तहसिलदार अर्चना यांनी अंतिम अरदाससाठी ग्रंथी सिंहचा प्रबंध केला. दरम्यान, एसडीएम विकास हिरा यांनी सांगितले की, आम्ही मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांशी संपर्क केला होता. मात्र, कुटुंबीयांनी पार्थीव शरीर घेण्यास नकार दिला, विशेष म्हणजे मृत व्यक्तीची एक मुलगी डॉक्टर असूनही तिने वडिलांचे पार्थीव घेण्यास नकार दिला. दरम्यान, या घटनेने माणूसकी मेल्याची भावना व्यक्त होत आहे.