नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यातच गोरगरीबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज जाहीर करताना कोरोनाविरोधातील लढा जीव धोक्यात घालून लढणाऱ्या डॉक्टर, नर्ससाठीही मोठी घोषणा केली होती. आज यामध्ये आणखी एक मुद्दा वाढविण्यात आला आहे.
सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुढील तीन महिन्यांत जरी अपघाती मृत्यू झाला तरीही त्याच्या कुटुंबीयांना पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजचा लाभ मिळणार आहे. २६ मार्चला जाहीर झालेल्या या योजनेचे नियम आज जाहीर करण्यात आले. यामध्ये डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार रुग्णांवर उपचारादरम्यान डॉक्टर, नर्सना काही झाल्यास ५० लाखांचा विमा देणार आहे.
या विमा सेवेची अंमलबजावणी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला देण्यात आली आहे. या विमा पॉलिसीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे सुमारे २२.१२ लाख कर्मचारी समाविष्ट आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना आधीच्या घोषणेनुसार कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्यास ५० लाख रुपये मिळणार होते. आता यामध्ये अपघाती मृत्यूचाही समावेश करण्यात आला आहे.
याची माहिती खुद्द अर्थमंत्र्यांच्या कार्यालयानेच दिली आहे. हा विमा आजपासून म्हणजेच ३० मार्चपासून लागू झाला आहे. ही पॉलिसी पुढील ९० दिवस लागू राहणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना कोणताही वेगळा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. नोकरीमध्ये ज्या व्यक्तीचे नाव वारसदार म्हणून दिलेले असेल त्यालाच ही रक्कम देण्यात येणार आहे.