नवी दिल्ली - गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण देशात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूची सध्या दुसरी लाट सुरू आहे. तसेच पुढच्या काही काळात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार जर लोकांनी बेफिकीरी दाखवली आणि कोरोना नियमांचे पालन केले नाही, तर देशात कोरोनाची तिसरी लाट लवकरच येऊ शकते. यापूर्वी आयआयटीच्या तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त धोका असल्याचे म्हटले होते. त्यामुळे पालकांमध्ये चितेचे वातावरण आहे, तसेच कोरोना विषाणूमुळे मुलांच्या मेंदूवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे. (Does coronavirus affect children's brains? Information provided by experts)
कोरोनाच्या पहिल्या दोन्ही लाटांमध्ये मुलांनाही मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. एवढेच नाही तर मुलांमध्ये पोस्ट कोविडच्या प्रभावामुळे अन्य आजारही दिसून येत आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर मुलांमध्ये मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतात का? हा प्रश्न विचारला जात आहे. कोरोना विषाणू फुप्फुसांप्रमाणेच मेंदूवरही परिणाम करतो का? याबाबत विचारले असता दिल्लीतील एम्समधील पीडियाट्रिक्स इंटेसिव्ह यूनिटच्या पीडियाट्रिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. राकेश लोढा म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग मुलांमध्ये असिम्थमॅटिक किंवा सौम्य लक्षणांसह दिसून आला आहे. अगदी मोजक्या रुग्णांमध्ये गंभीर परिणाम दिसून आले आहेत. एवढेच नाही तर केवळ काही मोजच्या मुलांमध्येच कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून आली आहेत.डॉ. लोढा यांनी सांगितले की, गंभीर कोरोना लक्षणांमध्ये बाधित मुलांच्या फुप्फुसांवर संसर्गाचा परिणाम अधिक प्रमाणात दिसून आला आहे. यामध्ये मेंदूवरही संसर्गाचा परिणाम अधिक प्रमाणात दिसून आला आहे. यामध्ये मेंदूवरही संसर्गाचा परिणाम दिसू शकतो. त्याचा परिणाम मेंदूचे संतुलन बिघडण्यामध्ये होऊ शकतो. कोरोनाच्या संसर्गामुळे फुप्फुसांवर विपरित परिणाम होते. त्यामुळे मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बाधित होतो. त्यामुळे नुकसान होऊ शकते. एवढेच नाही तर कोरोना हा अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारे मुलांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. तसेच दीर्घकाळापासून घरी राहिल्याने तसेच लॉकडाऊनमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने मुलांच्या पोषणावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत आर्थिक आणि सामाजिक नुकसानही झाले आहे. अशा प्रकारे कोरोनामुळे पीडित असो वा नसो मुलांच्या मेंदूवर कोरोनामुळे परिणाम झालेला आहे.