नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार 24 मार्चपासून देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्यामुळे देशातील बहुतांश लोक घरीच आहेत. त्यातही अनेक आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा दिली आहे. मात्र लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे कौटुंबिक हिंसाचारामध्ये वाढ झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. 24 मार्चनंतर कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे वाढली आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिल्लीतील डीसीपी (अॉपरेशन्स अँड कम्युनिकेशन) एसके सिंह यांनी सांगितले की, "देशाच्या राजधानीत महिलांसोबत होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांसंदर्भात येणाऱ्या फोन कॉलमध्ये वाढ होणे आमच्यासाठी धक्कादायक आहे. याआधी आम्हाला कौटुंबिक हिंसाचार आणि छेडछाडीसंदर्भातील फोन दरदिवशी सुमारे 900 ते 1000 या प्रमाणात येत असत. मात्र लॉकडाऊननंतर आम्हाला येणाऱ्या फोनकॉल्सची संख्या वाढून 1000 ते 1200 एवढी झाली आहे.
काही महिलांनी दिल्लीतील जेजे कॉलनीजवळून फोन केला आहे. त्यातून त्यांनी आपल्या शेजाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. काही विकृत मनोवृत्तीचे लोक भोजन आणि अन्य अत्यावश्यक वस्तूंचे निमित्त काढून फिरत आहेत आणि मुलींसोबत गैरवर्तन आणि छेडछाड करत आहेत, अशा आशयाच्या तक्रारी येत आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे महिलांना घराबाहेर पडून तक्रार करणे शक्य होत नाही आहे, मात्र महिलांकडून येणाऱ्या फोनकॉल्सचे प्रमाण वाढले आहे