नवी दिल्ली - गेल्या सव्वा महिन्यापासून देशभरात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या फैलावाने देशासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी अजून चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. देशात पसरत असलेल्या कोरोना विषाणूचे रूप अजून बदलणार असून, देशातील विविध भागात वेगवेगळ्या वेळी या साथीचा पिक येणार असल्याचे गुलेरिया यांनी म्हटले आहे. सध्या पश्चिम भारतात महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ( Dr. Randdeep Guleria Says, "Corona virus will change form further, corona will be harvested at different times across the country.")
रणदीप गुलेरिया म्हणाले की, उत्तर आणि मध्य भारताबाबत बोलायचं तर येथे पुढच्या काही आठवड्यांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत घट दिसून येणार आहे. मात्र जेव्हा देशाच्या पूर्वोत्तर आणि बंगालमध्ये नव्या रुग्णांचे प्रमाण घटले की, आपण भारतात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत, असे म्हणू शकू, हे या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीस घडेल, असेही गुलेरिया यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाविरोधात विकसित झालेल्या सर्व लसींना पेटंटमुक्त केले पाहिजे. तसेच या लसींचे उत्पादन कुठल्याही उत्पादकांना करण्याची परवानगी दिली पाहिजे, असे मतही गुलेरिया यांनी मांडले.
सध्या उत्तर भारतात बहुतांश लोक कोरोना विषाणूच्या ब्रिटिश स्ट्रेनमुळे संक्रमित झाले आहेत. तर महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटकमध्ये विषाणूचा डबल म्युटेंट दिसून येत आहे. दरम्यान सार्स कोव-२ च्या बी १.१.७ प्रकारामुळे बाधित होणाऱ्या लोकांच्या संख्येत गेल्या एका महिन्यामध्ये ५० टक्क्यांनी घट झाली आहे.