नवी दिल्ली - डीआरडीओने कोविड-१९ अँटीबॉडी डिटेक्ट करण्यासाठी एक किट बनवली आहे. डीपकोविन असे या अँटीबॉडी डिटेक्ट करणाऱ्या किटचे नाव असून, ही किट SARS-CoV-2 विषाणूच्या प्रोटिनला डिटेक्ट करू शकते. ही किट दिल्लीस्थित वेनगार्ड डायग्नोस्टिक प्रायवेट लिमिटेडसोबत मिळून विकसित केली आहे. या किटची चाचणी करण्यासाठी दिल्लीतील वेगवेगळ्या कोविड रुग्णालयामधून एक हजार रुग्णांच्या सँपलची चाचणी घेण्यात आली आहे. (DRDO Developed Dipcovan Antibody Detection Kit) गेल्या एका वर्षात या प्रॉडक्टच्या तीन वेगवेगळ्या बॅचची तपासणी करण्यात आली. तसेच याचवर्षी एप्रिल महिन्यामध्ये आयसीएमआरने या अँटीबॉडी डिटेक्शन किटला परवानगी दिली आहे. याच महिन्यामध्ये या प्रॉडक्टला हेल्थ मिनिस्ट्री ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)कडून परवानगी मिळाली आहे. ही किट बनवण्याची वाटण्याची आणि विक्री करण्याची परवानगी मिळाली आहे. डीसीजीआय रेग्युलेटरी अॅथॉरिटी आहे.
ह्युमन प्लाझ्मामध्ये कोविड-१९ च्या अँटीबॉडीचा या किटच्या माध्यमातून शोध घेता येऊ शकतो. या किटचे आयुर्मान दीड वर्ष एवढे आहे. ही किट विकसित करण्यामध्ये डीआरडीओची पार्टनर कंपनी असलेली वेनगार्ड डायग्नोस्टिक्स जून महिन्यामध्ये या किटचे अनावरण करणार आहे. तसेच अनावरणावेळी सुमारे १०० किट लाँच करण्यात येतील. या किटच्या माध्यमातून सुमारे १०० चाचण्या करता येणार आहेत.
सध्या लाँच झाल्यानंतर सध्यातरी दरमहा ५०० किट बनवण्याची कंपनीची क्षमता आहे. तसेच या किटच्या माध्यमातून एका टेस्टची किंमत ७५ रुपयांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. या किटमधून कुठल्याही व्यक्तीच्या शरीरात कोविड-१९ ची अँटीबॉडी आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. अनेकदा असिम्थमॅटिक रुग्णांना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे समजत नाही. मात्र आता या टेस्ट किटमधून अँटीबॉडीची माहिती मिळाल्यास त्यांना आधीच कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे निष्पन्न होईल. ही टेस्टिंग किट ९७ टक्के उच्च संवेदनशीलता आणि ९९ टक्के विशिष्टतेसोबत विषाणूच्या म्युटेशनची माहिती मिळू शकते. त्याबरोबरच ही टेस्टिंग किट विषाणूच्या न्यूक्लियोकॅप्सिंड प्रोटिनचीसुद्धा माहिती मिळवू शकते.