नवी दिल्ली - देशातील कोरोना विषाणूचे संकट आता अधिकच गंभीर झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला जबदरस्त धक्का बसला आहे. त्यातच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चार पैसे कमावण्याच्या आशेने शहरात आलेले मजुर आणि छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे असे लोक आता गावची वाट धरत आहेत. शहरात येऊन सुखी जीवन जगण्याची पोराबाळांच्या जीवनात थोडाफार आनंद आणण्याची अनेकांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. असे लोक आता कायमची गावची वाट धरण्याचा विचार करत आहेत. लॉकडाऊनमुळे आपली सर्व स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. आता दिल्लीतून गावी गेल्यावर पुन्हा कधीही शहराकडे परतून येणार नाही, असे चहाचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेने सांगितले आहे.
बिहारमधील पुर्णिया जिल्ह्यात राहणारी आशा देवी ही महिला मोठी स्वप्ने रंगवून दिल्लीत आली होती. येथील प्रीत विहार परिसरात चहा विकून ती गावापेक्षा अधिक कमाई करून लागली. मात्र कोरोना विषाणुचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे तिची सर्व स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. सध्या दिल्लीतील यमुना स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये तिला कुटुंबीयांसह हालाखीच्या अवस्थेत राहावे लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे आशादेवी निराश झाली आहे. आता एकदा घरी पोहोचल्यावर पुन्हा दिल्लीत येणार नाही. मला आता पैशांची पर्वा नाही, अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सध्याच्या घडीला दिल्लीत आशादेवींसारखे सुमारे ४० लाख हातावर पोट असलेले मजूर आहेत. कोरोनामुळे कोसळलेल्या अकल्पनीय संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आपल्या गावी जाण्याचे वेध लागले आहेत. या मजुरांकडून पुन्हा शहरात न परतण्याची भाषा करण्या येत असल्याने अर्थतज्ज्ञांची चिंता वाढली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या मजुरांना गावी पतण्याची परवानगी देऊन प्रवासाची व्यवस्था सरकारकडून करण्यात आल्याने या मजुरांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
अनेक मजूर मिळेल त्या साधनाने गावी परतत असले तरी काही मजूर मात्र शहरातच थांबले आहेत. सोबत दोन छोट्या मुली असल्याने पायी गावी जाण्याऐवजी सरकारी शेल्टर होममध्ये जाणे आपण पसंद केल्याचे हेमेश कुमार नावाचा एका कामगाराने सांगितले. मात्र सरकारने गावी जायची व्यवस्था केल्यास आपण गावी परतणार असून, त्यानंतर दिल्लीत परत येणार नसल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, दिल्लीसारख्या शहरात कमाई झाली तेवढी झाली. आता गावी परतायचे आहे. काम कुठेही मिळेलच. पण आता सध्याच्या परिस्थितीत कुटुंबाकडे परतायचे आहे, असेही काही मजुरांनी सांगितले.