सुशांत कुंकळयेकर
मडगाव: प्रश्न केवळ 8 हजार गोमंताकीय खलाशांचाच नव्हे तर देशभरातील तब्बल 21, 247 खलाशी जगभरातील वेगवेगळ्या समुद्रात अडकून पडले असून त्यांना त्वरित सोडविण्यासाठी पाऊले उचलावीत यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणला जात आहे.
मर्चंट नेव्हीवर मुख्य अभियंते म्हणून काम करणारे गोमंतकीय सुपुत्र क्रूझ जुडास बार्रेटो यांनी भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पाठविलेल्या एका पत्रात तब्बल 197 जहाजावर 21,247 भारतीय खलाशी अडकून पडल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, गोवा सीमेन अससोसिएशन या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्थिती हाताबाहेर जात असल्याचे नमूद केले आहे.
अमेरिकेने सर्व जहाजांना किनारे सोडून जाण्याचे आदेश दिले असून 100 दिवासानंतर एकही जहाज अमेरिकाच्या किनाऱ्यावर येऊ देणार नाही असे सांगितले आहे याकडे लक्ष वेधले आहे. यापुढे अडकलेल्याना फक्त चार्टर विमानानेच न्यावे लागेल त्यांना सर्वसाधारण विमानाने जाण्यास निर्बंध घातले आहेत याकडेही लक्ष वेधले आहे. सध्या जो विंडो पिरियड चालू आहे त्यात खलाशाना मायदेशी आणावे आणि घरच्या लोकांशी त्यांची गाठ घालून द्यावी अशी मागणी वाझ यांनी आपल्या पत्रातून केली आहे.