नवी दिल्ली – जागतिक महामारी कोरोनाने आतापर्यंत जगातील १८५ देशांना विळख्यात ओढलं आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसागणिक वाढत चालला आहे. जगात ७ लाख २३ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३३ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचं पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलं आहे.
भारतात कोरोना व्हायरसची संख्या वाढत चालली असून कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजारच्या वर गेली आहे. २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत छत्तीसगडच्या दंतेवाडा येथील वेदनादायक गोष्ट समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे एक बाप आपल्या एक वर्षाच्या चिमुकल्याच्या अंत्ययात्रेतही सहभागी होऊ शकला नाही हे दुर्दैवी चित्र पाहायला मिळालं.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे घोटपाल गावातील रहिवाशी राजकुमार नेताम एसएसबीमध्ये हवालदार पदावर कार्यरत आहेत. सध्या नेपाळ बॉर्डरवर त्यांना तैनात करण्यात आलं आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतरही कर्तव्य आणि लॉकडाऊनमुळे त्याचे हात बांधले गेले. डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते कारण आयुष्यभर हीच खल बापाच्या मनात कायम राहणार की, शेवटच्या क्षणी मुलाचा चेहरा मनभरुन पाहताही आला नाही.
अशा बिकट अवस्थेत सैनिक पित्याने डोळ्यातील वाहत्या पाण्यासह व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मुलाची अंत्ययात्रा पाहिली. पण त्याला अंत्ययात्रेत सहभागी होता आले नाही. अंत्ययात्रेत आपल्या चिमुकल्याचा चेहरा बघून बापाच्या तोंडातून शब्द निघाला ‘लव्ह यू बेटा’ असं दुर्दैवी नजारा पाहून उपस्थित सगळ्यांचेच डोळे पाणावले होते.
राजकुमार यांच्या मुलाला अनेक महिन्यापासून ट्यूमरचा त्रास होता. त्याच्यावर उपचारही झाले होते. उपचारासाठी राजकुमार गावी आला होता. उपचारानंतर राजकुमार पुन्हा ड्युटीवर परतला. पण बुधवारी अचानक मुलाच्या तब्येतीत बिघाड झाला. नातेवाईकांना त्याला जिल्हा रुग्णालयात हलवले. पण रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी राजकुमार यांना माहिती दिली तेव्हा त्यांनी परतण्याचा प्रयत्न केला पण लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही.