वाराणसी – सध्या जगभरात कोरोना व्हायरसचं संकट उभं राहिलं आहे. आतापर्यंत १३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७४ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून कोरोनाचा आकडा ४ हजारांपर्यंत पोहचला आहे. तर ११४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील बहुतांश देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही विनाकारण घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. भारतातही १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र काही नमुने यातही शक्कल लढवत घराबाहेर पडत आहे.
वाराणसी जिल्ह्यातील चोलापूर पोलीस स्टेशन भागात राहणाऱ्या एका युवकास पोलिसांनी अटक केली आहे. सासरवाडीवर रुबाब दाखवण्यासाठी हा युवक पोलिसांची वर्दी घालून रस्त्यावरुन फिरत होता. पोलिसांना या युवकावर संशय आल्याने त्यांनी युवकाची विचारपूस करण्यास सुरुवात केली. संशय वाढल्याने युवकाला ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी युवकाविरूद्ध सारनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सारनाथ येथील निरीक्षक विजय बहादुर सिंह सोमवारी रात्री गस्त घालण्यासाठी बाहेर गेले होते. तेव्हा रजनाहिया भागात असताना एका युवक दुचाकीवरुन खाकी गणवेशात दिसला. थंडीच्या दिवसात वापरणारा खाकी ड्रेस पाहून निरीक्षक विजय बहादुर सिंह यांनी त्या युवकाला उभं केलं. उन्हाळ्याच्या दिवसात पोलीस तो खाकी ड्रेस घालत नाही. पोलिसांनी त्या युवकावर संशय आल्याने त्यांनी विचारपूस केली. तेव्हा तो पोलीस नसल्याचं उघड झालं त्यावेळी त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान युवकाने सांगितले की, त्याची सासरवाडी याच परिसरात आहे. मागील सहा महिन्यांपासून तो रुबाब दाखवण्यासाठी पोलिसांच्या खाकी वर्दी घालतो. देशात लॉकडाऊन घोषित झाला तेव्हा खाकी वर्दी असल्याने बिनधास्तपणे तो याठिकाणी पोहचतो. पोलीस हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात वेगळा ड्रेस घालतात ते त्याला माहिती नव्हते. पोलिसांनी या युवकाला अटक करुन कोर्टात हजर करणार आहे.