मुंबई - कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग चिंतित आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या १२ तासांत भारतात १३१ नवे रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९६५ वर पोहोचली आहे. मात्र, यामधील १५१ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १७६४ इतका झाला आहे. तर, देशात आतापर्यंत कोरोनामुळे ५० जणांचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने, या कठिण प्रसंगात अनेक ठिकाणी माणूसकीचे दर्शन घडत आहे.
लॉकडाऊन असल्याने गरिब, मजूर आणि कामगार वर्गाची मोठी उपासमार होत आहे. तसेच, शहरातून आपल्या गावाकडे लोकं पळत आहेत. गावाकडे जाण्यासाठी रांगाच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, नागरिकांनी आहे तिथेच राहावे असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. लॉकडाऊन असल्याने पोलिसांकडून नागरिकांना कायद्याचा धाक दाखवून घरातच बसण्याचे सूचविण्यात येत आहे. तर, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलिसांनाही मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यामुळेच, जागोजागी माणूसकीचे दर्शन होत आहे. रायबरेली येथील एका पोलीस ठाण्यातील फोटो सध्या व्हायरल झाला आहे. कारण, या पोलीस ठाण्यातचं गरिबांसाठी भोजनगृह सुरु करण्यात आले आहे. गरिबांसाठी येथेच अन्न शिजविण्यात येत आहे. विशेष म्हणजे महिला पोलिसांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी माणूसकीचं मोठं उदाहरण देशापुढे ठेवले आहे. या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी वर्दीतली माणूसकी दाखवून दिलीय.
विशेष म्हणजे येथील महिला पोलीस आपली ड्युटी करुन गरिबांसाठी ही सेवा देत आहेत. तसेच, या गरिबांना त्यांच्यापर्यंत पोहोचून ते अन्न वाटण्याचे काम ते करत आहेत. येथील पोलीस ठाण्याच्या प्रमुख संतोष सिंह यांच्या नियोजनात हे काम सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार राज्यातील कुणीही उपाशीपोटी झोपता कामा नये. त्यामुळेच, आम्ही गरजूंची भूक भागविण्याचं काम करत आहोत. रायबरेलीत कुणीही उपाशीपोटी झोपणार नाही, हे पाहणं आमचं कर्तव्य असल्याचं संतोष सिंह यांनी म्हटलं आहे.
जलौन, उरई येथील महिला पोलीस ठाण्याच्या प्रमुख नीलेश कुमारी यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह गरिबांना फळे आणि अन्न पुरविण्याचं काम हाती घेतलं आहे. १४ एप्रिलपर्यंत गरजूंना अन्न पुरविण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे नीलेश कुमारी यांनी म्हटलं आहे.