नवी दिल्ली - राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली. महाराष्ट्रातील 7 जागांसह देशातील 17 राज्यांतील राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. या जागांवरील सध्याच्या सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळेच, 26 मार्च रोजी या 55 जागांसाठी मतदान घेण्यात येणार होती. मात्र, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे, २६ मार्च रोजी होणारी राज्यसभेची निवडणूकही रद्द करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले..
राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली होती. त्यानुसार, 6 मार्च रोजी अर्ज उपलब्ध होणार होते. 13 मार्चपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे होते. 16 मार्च रोजी अर्जांची छाननी होऊन 18 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर, 26 मार्च रोजी राज्यसभेच्या 55 जागांसाठी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली आहे. तर मतदानादिवशीच म्हणजे 26 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांची घोषणा होणार होती. मात्र, निवडणूक आयोगाने २६ मार्च रोजी होणारी राज्यसभेची निवडणूक रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे, उर्वरीत १८ सदस्यांसाठीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्यसभा निवडणुकांसाठीच्या ५५ जागांसाठी ३७ उमेदवार बिनविरोध निवडूण आले आहेत. त्यामुळे, उर्वरीत १८ जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होणार होती. मात्र, निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक रद्द केली आहे. तसेच, निवडणुकांच्या नवीन तारखांची घोषणा नंतर करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत होते. नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे राज्यात 31 मार्चपर्यत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केला. तर, देशभरातील ३० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्येही लॉक डाऊन आहे. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे.