नवी दिल्ली : देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. एखाद्याला लस मिळण्याचे राहून गेले असा प्रकार घडणार नाही, असेही ते म्हणाले. एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होईपर्यंत या आजारापासून वाचण्यासाठी सर्वांनीच खूप काळजी घ्यायची आहे. सर्व कोरोना योद्ध्यांच्या जीवाचे रक्षण करण्यावरही आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. कोरोना साथीशी मुकाबला करण्याबाबतचे धोरण ठरविण्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञांची समिती नेमली आहे. कोरोना प्रतिबंधक लस विकसित झाल्यानंतर ती प्रत्येकाला देण्याबाबत केंद्र सरकार लस धोरण जाहीर करेल. देशामध्ये २८ हजारपेक्षा जास्त शीतगृहांची साखळी असून त्यामध्ये कोरोना लसीची साठवणूक होऊ शकते. त्यामुळे तळागाळातल्या व्यक्तीलाही लस देण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल. प्रत्येक नागरिकाला लस टोचण्यात आल्याची गाव, जिल्हा, राज्य पातळीवरील पथकांकडून खात्री करून घेतली जाईल. लसीच्या वितरणासाठी नियोजनबद्ध यंत्रणा उभारली जाईल. या सर्व गोष्टींवर डिजिटल तंत्राद्वारे लक्ष ठेवण्यात येईल.
वारंवार हात धुवा; डिस्टन्सिंग पाळा नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा संसर्ग सगळ्याच ठिकाणी सारख्या प्रमाणात पसरलेला नाही. या साथीच्या स्थितीबाबतची अनिश्चितता लक्षात घेता जोपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस विकसित होत नाही, तोवर वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे या गोष्टी नियमितपणे पाळाव्यात. त्यातूनच सध्यातरी कोरोनाला दूर राखता येईल असेही ते म्हणाले.