नवी दिल्ली - सध्या आहे तशीच स्थिती राहिल्यास येणाऱ्या काळात कोरोनाचा सर्वाधिक संक्रमक प्रकार डेल्टा इतर स्वरुपांच्या तुलनेत अधिक गंभीर होऊ शकतो. असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. जगातील एकूण 85 देशांत हा व्हेरिएंट आढळल्याची पुष्टी झाल्यानंतर, डब्ल्यूएचओने हा इशारा दिला आहे. (CoronaVirus is expected to dominate the delta form cases reported in 85 countries)
डब्ल्यूएचओकडून 22 जूनला जारी करण्यात आलेल्या कोविड-19 साप्ताहिक महामारी विज्ञान अपडेटमध्ये म्हणण्यात आले आहे, की जागतिक स्थरावर, अल्फा स्वरूप 170 देशांत अथवा भागांत आढळून आले आहे. बीटा स्वरूप 119 देशांत, गॅमा स्वरूप 71 देशांत तर डेल्टा स्वरूप 85 देशांत आढलून आले आहे.
जगभरात एकूण 85 देशांत आढळला डेल्टा -अपडेटमध्ये सांगण्यात आले आहे, की “जगभरात डेल्टा एकूण 85 देशांत आढळून आला आहे. डब्ल्यूएचओ अंतर्गत सर्वच भागांतील इतर देशांतही याचे रुग्ण आढळून येत आहेत. यासंदर्भात बोलताना डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की सध्याचे चार चिंताजनक व्हेरिएंट, अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा, यांच्यावर लक्ष आहे. जे सर्वाधिक पसरले आहेत. तसेच डब्ल्यूएचओ अंतर्गत येणाऱ्या सर्वच भागांत ते आढळून आले आहेत. “डेल्टा स्वरूप हे अल्फा स्वरूपाच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणावर संक्रामक आहे आणि सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर तो अधिक संक्रमक होण्याचीही शक्यता आहे,’’ असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण भारतात -अपडेटनुसार, गेल्या आठवड्यात म्हणजेच 14 जून ते 20 जूनदरम्यान कोरोनाचे सर्वाधिक 4,41,976 रुग्ण भारतातच समोर आले आहेत. हे यापूर्वीच्या आठवड्याचा विचार करता, 30 टक्क्यांने कमी आहेत. याशिवाय सर्वाधिक मृत्यूही भारतातच झाले आहेत. (16,329 लोकांचा मृत्यू, प्रति एक लाखावर 1.2 लोकांचा मृत्यू, 31 टक्क्यांची घट). आग्नेय आशियात जवळपास 6,00,000 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 19,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्रमश: 21 आणि 26 टक्क्यांनी कमी आहे.
कोरोनाच्या डेल्टा आणि अल्फा व्हेरिएंटविरोधात लशींचा प्रभाव -लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी डेल्टा आणि अल्फा व्हेरिएंटमुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ नये म्हणून फायझर आणि बायोएनटेक कोमिरनेटीची प्रभाव क्षमता प्रत्येकी 96 तथा 95 टक्के आहे. एस्ट्राजेनेका आणि व्हॅक्सजेव्हरियाची क्रमश: 92 टक्के आणि 86 टक्के एवढी आहे. लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 21 दिवसांनंतरही या लशींची प्रभाव क्षमता डेल्टा तथा अल्फा व्हेरिएन्ट विरोधातील 94 टक्के तथा 83 टक्के दिसून आली आहे.