नवी दिल्ली – भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना लॉकडाऊन वाढवणार की नाही याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. राज्य सरकारने दिलेल्या शिफारशीनुसार १४ एप्रिलनंतरही देशात लॉकडाऊन वाढवावा अशी मागणी केली आहे. मात्र केंद्र सरकारने अद्याप यावर स्पष्ट भूमिका घेतली नाही. तरीही लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत सरकारकडून मिळत आहेत.
कोरोना व्हायरसच्या या संकटकाळात सोशल मीडियातही अनेक अफवांना पेव फुटले आहे. चुकीचे मॅसेज लोकांकडून व्हायरल केले जात आहे. लॉकडाऊनबाबतही सोशल मीडियात मॅसेज व्हायरल होत आहेत. देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करुनही कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजारांच्या वर पोहचली आहे. तर १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊन वाढवण्याबाबत सोशल मीडियात एक मॅसेज व्हायरल होत आहे त्यात दावा केला आहे की, भारत सरकारने कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देशातील हॉटेल, रेस्टॉरंट येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारने हा मॅसेज चुकीचा असल्याचं सांगितलं आहे. संदेशात असणारा दावा निराधार असून भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने अशाप्रकारे कोणतेही आदेश दिले नाहीत. १४ एप्रिलनंतर देशात लॉकडाऊन हटवावा की नाही याबाबत सरकार परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देशात मार्चमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, सिनेमा हॉल बंद करण्यास सांगितले होते. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या ५ लाखांहून अधिक सदस्यांना ३१ मार्चपर्यंत भोजन सेवा बंद करण्याची सूचना केली होती. त्यानंतर पार्सल सेवा सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पीआयबीने याबाबत फॅक्ट चेक केलं असून हॉटेल्स, रेस्टॉरंटचे लॉकडाऊन वाढवण्याचे आदेश दिल्याचं खोटं आहे असं स्पष्टीकरण दिलं आहे.