अजमेर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनदरम्यान गरजूंसाठी सरकार आणि विविध सामाजिक संस्थांकडून आवश्यक असे साहित्य आणि रेशन पुरविले जात आहे. मात्र, काही लोक याचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेत आहे. अशीच एक घटना शुक्रवारी राजस्थानमधील अजमेर येथील समोर आली आहे.
अजमेर येथील एक व्यक्तीने लॉकडाऊनदरम्यान सुविधांचा गैरफायदा घेल्याचे समोर आल्यानंतर त्याच्याविरोधात जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या व्यक्तीने सरकारकडे फोनवरून मदत मागितली होती. त्यानुसार, त्याच्या घरी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते रेशनचे साहित्य पाठविले. मात्र, सरकारी कर्मचारी त्याच्या घरी पोहोचले, त्यावेळी त्याच्याजवळ महिनाभराचे रेशन मिळाले. एवढेच नव्हे, तर फ्रिजमध्ये चिकन सुद्धा होते.
याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी हिरालाल मीणा यांनी सांगितले की, खानपुरामधील चांद मोहम्मद याने शुक्रवारी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षात फोन करून रेशन मागविले होते. त्याची मदत करण्यासाठी प्रशासनाने स्थानिक अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी चांद मोहम्मद याने पुन्हा फोन करून सांगितले की, माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे, तुम्ही माझ्या मृत्यूनंतर मला मदत पोहोचणार का, असा सवाल केला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने खानपुराच्या रेशन विभागाला कळविले आणि रेशन त्याच्या घरी पाठविले.
जिल्हा प्रशासनानुसार गरजूंना आवश्यक त्या सुविधा सरकारकडून पुरविल्या जात आहेत. यासाठी गरजू व्यक्तींची चौकशी करण्यासोबतच त्यांना रेशन देण्यात येत आहे. मात्र, चौकशी केल्यानंतर चांद मोहम्मद याच्याकडे दुचाकी, गॅस कनेक्शन, फ्रिज, कूलर यांसारख्या वस्तू दिसून आल्या. गरज नसतानाही रेशनची मागणी चांद मोहम्मद यांनी केली, असे हिरालाल मीणा यांनी सांगितले. दरम्यान, अशा लोकांमुळे गरजूंपर्यंत रेशन वेळेवर पोहोचण्यास अडचण निर्माण होते.